नवी दिल्ली: सीमारेषेवर कोणतीही परिस्थिती उद्भवली तरी चीनला भारतावर वर्चस्व मिळवता येणारच नाही, असा विश्वास वायूदलप्रमुख आरकेएस भदोरिया यांनी व्यक्त केला. ८ ऑक्टोबरला होऊ घातलेल्या वायूदल दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकारपरिषदेत ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी आरकेएस भदौरिया यांनी म्हटले की, आपल्या शेजारच्या आणि त्यापलीकडच्या प्रदेशात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असली तरी भारत कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. एकाचवेळी दोन आघाड्यांवर युद्ध लढण्यासाठी आपला देश सक्षम असल्याचे भदौरिया यांनी स्पष्ट केले. (there is no way Chinese can defeat us IAF Chief Air Chief Marshal RKS Bhadauria)
In the ongoing standoff in the north, there is no way they (Chinese) can defeat us: IAF Chief Air Chief Marshal RKS Bhadauria pic.twitter.com/Ly0hfGytgl
— ANI (@ANI) October 5, 2020
यावेळी त्यांनी लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावाविषयीही भाष्य केले. लडाखमध्ये भारतीय सैन्य अगदी मोक्याच्या जागेवर तैनात आहे. त्यामुळे चीनच्या बाजूने कोणताही धोका उत्पन्न झाल्यास भारतीय लष्कर त्याला सक्षमपणे तोंड देऊ शकते. चिनी हवाईदलाने कितीही ताकद लावली तरी ती भारताच्या क्षमतेपुढे अपुरी पडेल. मात्र, आम्ही शत्रूला कमी लेखण्याची चूक करणार नाही, असेही आरकेएस भदौरिया यांनी स्पष्ट केले.
गेल्या पाच महिन्यांपासून पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यात तणावाचे वातावरण आहे. लष्करी आणि राजनैतिक स्तरावर चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्यानंतरही हा तणाव अद्याप निवळलेला नाही. आता १२ ऑक्टोबरला दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये पुन्हा चर्चा होईल. यावेळी लडाखमधून सैन्य माघारी घेण्यासंदर्भात चर्चा होईल.
(there is no way Chinese can defeat us IAF Chief Air Chief Marshal RKS Bhadauria)