अमरावती : एकीकडे केंद्र आणि महाराष्ट्र सरकार स्वच्छ भारत अभियानाचा डंका वाजवत आहेत, तर दुसरीकडे मात्र अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या उर्दू प्राथमिक शाळेत डुकरांचा वावर होत असल्याने शाळेच्या आवारात अस्वच्छता निर्माण झाली आहे. यामुळे मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या उर्दू प्राथमिक शाळेत मोकाट डुकरं, जनावरे यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे प्राथमिक शाळेत लहान विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ज्या ठिकाणी शालेय पोषण आहार बनवला जातो. त्या ठिकाणी सुद्धा बऱ्याचदा डूकरं आढळून आले आहेत. त्यामुळे ‘स्वाईन फ्लू’ सारख्या आजाराची लागण विद्यार्थ्यांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी अनेक वेळा नगर परिषदेला शाळा व्यवस्थापक समितीने पत्रव्यवहार केला. मात्र शाळेला अजूनपर्यंत संरक्षण भिंत बांधून दिलेली नाही.
आता शाळा व्यवस्थापक समितीने घेतलेल्या ठरावाच्या प्रतिसह शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन डुकरांचा बंदोबस्त करावा किंवा आवार भिंत बांधण्याची मागणी केली आहे. मात्र नगर परिषदेचा आरोग्य विभाग दुर्लक्ष करीत असल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
उर्दु शाळेतील गंभीर प्रकाराबाबत मी माझ्या सहकारी नगरसेवकांसोबत पाहणी केली असुन, हा प्रकार नगर परिषद प्रशासन आणि नगराध्यक्षांच्या लक्षात आणून दिला आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष दिले पाहिजे, कारण लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. डूकरांचा बंदोबस्त करून आवात भिंत बांधून द्यावी. अन्यथा आम्हाला नाईलाजास्तव जनआंदोलन उभारावे लागेल असे भाजप गटनेता संजय मोटवानी यांनी म्हटले.