उदयपुर : पाकिस्तान निर्मित ‘चिली मिली’ या नावाने प्रसिद्ध असलेली कॅन्डी उदयपुरच्या ( Udaipur ) बाजारातील एका दुकानदाराकडे सापडल्याने खळबळ उडाली असून हा विक्रेता चौकशीच्या फेऱ्यात अडकला आहे. ही ‘चिली मिली’ कॅन्डी बीफ म्हणजे गायीच्या जिलेटीनपासून तयार होत असल्याने ही कॅन्डी जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही कॅन्डी आपण मुंबईतून (mumbai ) खरेदी केल्याचे दुकानदाराचे म्हणणे असून त्याच्याकडे याचे बिलमात्र नसल्याचा दावा त्याने केला आहे.
उदयपूरच्या दिल्ली गेट बाजारातील एका दुकानदाराकडे पाकिस्तानची ‘चिली मिली’ या नावाने प्रसिद्ध असलेली मिठाई कॅन्डी सापडली आहे. या कॅन्डीची निर्मिती बीफच्या जिलेटीनपासून तयार केली जाते. या दुकानातून शहरात इतर दुकानातही माल सप्लाय केला जात असतो.
या दुकानदाराची अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता ही टॉफी त्याने मुंबईतून खरेदी केली असल्याचा दावा त्याने केला आहे. मात्र आपण त्याचे बिल घेतले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. पोलीस कंट्रोल रुमपासून अवघ्या काही मीटर अंतरावर ही पाकिस्तानी मिठाई विकली जात असल्याचे उघडकीस आले आहे.
या मिठाईचे सर्व बॉक्स अन्न आणि औषध प्रशासनाने जप्त केले असून चौकशी सुरू केली आहे. शहरातील इतर दुकानातून ही कॅन्डी विकली जात आहे का याचा तपास सुरू करण्यात आला आहे. या मिठाईचे नमूने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या दुकानात मिठाईचे दोन मोठे पॅकेट सापडले असून एका बंद पॅकेटमध्ये 24 कॅन्डी होत्या. तर उघडलेल्या पॅकेटमध्ये 23 कॅन्डी होत्या.
या कॅन्डी कलरफूल पॅकेटातून विकल्या जात असून त्या पाकिटावर ‘मेड इन पाकिस्तान’ असे लिहिले आहे. या कॅन्डी 20 रूपयाला विकल्या जात असून या दुकानातून अन्य दुकानांना माल जात असल्याने इतर दुकानांची झडती सुरू झालेली आहे. या पाकिटांवर बलुचिस्तानचा पत्ताही लिहीलेला आढळला आहे. पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.