पुणे : कोरोनाचा सामना करण्यासाठी पुण्यातील हिंजवडी येथे विप्रो कंपनीने सरकारसोबत येत एका महिन्यात अद्ययावत कोरोना आरोग्य केंद्र उभं केलं आहे (Inauguration of COVID Centre in Hinjwadi Pune). यात 504 बेड, 18 व्हेंटिलेटर, 2 अद्ययावत रुग्णवाहिकेसह सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या रुग्णालयाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी विप्रोने सरकारसोबत येऊन केलेल्या या वेगवान आणि दर्जेदार कामाबद्दल त्यांचं कौतुक केलं.
उद्धव ठाकरे म्हणाले, “विप्रोने यासाठी आपली 1.8 लाख स्क्वेअर फुट एवढी आपली आयटीची इमारत दिली आहे. 5 मे रोजी सामंजस्य करार करून अवघ्या महिना सव्वा महिन्यात त्यांनी ती आम्हाला दिली आहे. विप्रो सामाजिक कार्यात सुद्धा किती वेगाने आणि दर्जेदार पद्धतीने काम करते याचे हे रुग्णालय प्रतिक आहे. मी यासाठी रिशद प्रेमजी यांचे मन:पूर्वक आभार मानतो.”
कोरोनासारखे संकट अनेक वर्षानंतर आले आहे. पब्लिक प्रायव्हेट प्रोजेक्ट तत्वावर उभारण्यात आलेल्या देशातील या पहिल्यावहिल्या कोविड रुग्णालयाचे आजपासून लोकार्पण होतेय. निश्चितच केवळ पुण्यासाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी ही समाधानाची बाब आहे. विप्रोने हे 504 बेड्सचे अद्ययावत कोविड केअर हॉस्पिटल उभारले आहे. याठिकाणी 18 व्हेंटिलेटर्स, आयसीयू सुविधा आणि इतर सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. सुविधायुक्त 2 रुग्णवाहिका सुद्धा विप्रो देत आहे. हे आता समर्पित कोविड आरोग्य केंद्र म्हणून ओळखले जाईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“आज महाराष्ट्रात 85 प्रयोगशाळा, सव्वादोन लाख पीपीई किट, सव्वाचार लाख एन 95 मास्क”
उद्धव ठाकरे म्हणाले, “दोन महिन्यांपूर्वीच महाराष्ट्राने कोरोनाची लढाई सुरु केली. त्यावेळी आरोग्य सुविधा पुरेशा नव्हत्या. आज महाराष्ट्रात कोरोनाशी लढण्यासाठी आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर सुविधा निर्माण झाल्या आहेत. सुरुवातीला आमच्याकडे केवळ 2 प्रयोगशाळा होत्या. आता 80 ते 85 प्रयोगशाळा झाल्या आहेत. लवकरच प्रयोगशाळांची संख्या 100 पर्यंत जाईल. सुरुवातीला आमच्यासमोर पीपीई किट्स, एन 95, व्हेंटिलेटर्स कुठून आणायचे हा प्रश्न होता. आता मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. आज आपल्याकडे 2 लाख 30 हजार पीपीई किट, 4 लाख 20 हजार एन 95 मास्क आहेत. पूर्वी 3 आयसोलेशन केंद्रे होती आणि केवळ 350 बेड्स होते. आज आपल्याकडे 1484 कोविड सेन्टर्स, 2.5 लाख बेड्सची सुविधा आहे.”
मोठ्या शहरांमध्ये जम्बो सुविधांची निर्मिती
मोठ्या शहरांमध्ये आम्ही जम्बो सुविधा निर्माण करत आहोत. आपण चीनचे उदाहरण देतो, पण आम्ही इथे मुंबईत बीकेसीत अवघ्या 15 दिवसांमध्ये देशातले पहिले फिल्ड हॉस्पिटल उभारले. यात 1000 बेड्सची सोय केली. त्याच्या बाजूलाच दुसरे केंद्र उभारले जात आहे. गोरेगाव येथे नेसको येथे जम्बो सेंटर सुरु झाले आहे. नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्रातील कोविड सेंटर सुरु होत आहे. केवळ फिल्ड हॉस्पिटल्स उभारुन चालणार नाही, तर त्यात काम करायला डॉक्टर्स, नर्सेस, स्टाफ लागणार आहेत. तो देखील सर्व माध्यमांतून आम्ही तयार करत आहोत. विप्रो सारख्या नामवंत जागतिक कंपनीने स्वत:हून पुढे येत, अशी अद्ययावत सुविधा निर्माण करण्याची तयारी दर्शविली आणि विप्रो हे नाव त्यात असल्याने आम्हीही लगेच त्याला मान्यता दिली, असंही उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.
ते म्हणाले, “आम्ही लॉक उघडायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आमच्यासमोर आव्हानही आहेत. पण ते सर्वांच्या मदतीने निश्चितपणे आम्ही पेलू, असा मला विश्वास आहे. या अतिशय अद्ययावत रुग्णालयाबद्धल मी रिशभ प्रेमजी यांचे मनापासून आभार मानतो. या रुग्णालयाचा उपयोग करण्याची वेळ कुणावरही न येवो. तशी वेळ आल्यास आनंदाने आणि खणखणीतपणे बरे होऊन तो रुग्ण बाहेर पडो हीच सदिच्छा.”
संबंधित बातम्या :
माझ्या शरीरावर ‘कोरोना’ संशोधन करा, सोलापुरात पॅरोलवरील कैद्याचे पत्र
मुंबईत दर दिवशी 50 हून अधिक कोरोनाबळी, कोणत्या वयोगटाला धोका जास्त?
…तर संपूर्ण नागपूर शहर कोविडच्या विळख्यात, तुकाराम मुंढेंकडून भीती व्यक्त
Inauguration of COVID Centre in Hinjwadi Pune