भोपाळ : येत्या 11 एप्रिल रोजी देशात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या ट्प्प्यातील मतदान पार पडणार आहे. ही निवडणूक सुरु होण्याआधी मध्य प्रदेशात आयकर विभागाने राजकारणी, व्यापारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरात छापेमारी केली आहे. या छापेमारीत आतापर्यंत 281 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्याशिवाय देशी-विदेशी महागडी दारु, शस्त्र आणि वाघाची कातडीही या कारवाईदरम्यान सापडली आहे. दिल्ली, इंदूर, भोपाळ, गोवा या चार राज्यांमधील जवळपास 52 ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली. यात 300 हून अधिक आयकर अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
कारवाईला अशाप्रकारे सुरुवात
लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात काळ्या पैशाची उलाढाल होत असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली होती. त्याच पार्श्वभूमीवर आयकर विभागाने दिल्ली, इंदूर, भोपाळ, गोवा या चार राज्यांमध्ये काही राजकारणी तसेच मोठ्या कंपन्यांवर धाड टाकण्याचा निर्णय घेतला. यानुसार दिल्लीच्या आयकर कार्यालयातून अधिकारी विविध ठिकाणी रवाना झाले. दरम्यान याबाबत कोणालाही थांगपत्ता लागू नये यासाठी त्यांनी एक खाजगी गाडी घेतली. रविवारी रात्री 3 च्या सुमारास आयकर विभागातील अधिकाऱ्यांनी या कारवाईस सुरुवात केली.
यात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे खासगी सचिव प्रवीण कक्कड, राजेंद्र कुमार मिगलानी, अश्विन शर्मा, पारसमल लोढा, प्रवीण जोशी तसेच मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा रातुल पुरी यांच्या घरावर धाडी टाकल्या. यात एकट्या प्रवीण कक्कड यांच्या घरातून तब्बल 9 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली. तसेच भोपाळमधील प्रसिद्ध अमीरा ग्रुप आणि मोजेर बेयर या कंपन्यांवरही आयकर विभागाने छापे मारले.
या छापेमारीत 14 करोड 6 लाखांची रोख रक्कम जप्त केली आहे. तसेच 252 देशी-विदेशी महागडी दारु, हत्यारे, वाघाची कातडीही या छापेमारीत आयकर विभागाने जप्त केली आहे. तसेच दिल्लीच्या एका राजकीय नेत्याच्या नातेवाईकाकडे 230 कोटी रुपयांचे गुप्त व्यवहार, खोट्या बिलांच्या सहाय्याने केलेली 242 कोटी रुपयांपेक्षा अधिक टॅक्स चोरी उघड झाली आहे. तसेच 80 पेक्षा अधिक कर बुडवणाऱ्या कंपन्या उघडकीस आल्या आहे. आयकर विभागाने आतापर्यंत केलेल्या कारवाईत मध्यप्रदेशातील व्यापारी, राजकारणी आणि वरिष्ठ नोकरदाऱ्यांच्या घरावर धाड टाकली आहे. यात एकूण 281 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
त्याशिवाय या कारवाईत दिल्लीत एका पक्षाच्या कार्यालयात पाठवण्यात येणारी 20 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. यात रोख रक्कम, कॉम्प्युटर फाईल, दस्तावेज, तसेच पक्षाचे सामानही जप्त करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी जबलपूरजवळ चार करोड रुपये रोख जप्त करण्यात आली होती. दरम्यान आतापर्यंत कारवाई करण्यात आलेल्या ठिकाणी सीआरपीएफचे सुरक्षारक्षक पहारा देत आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांना या ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
या छापेमारीबाबत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी प्रतिक्रिया देताना केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “गेल्या 5 वर्षात केंद्रात सत्तेत असलेले सरकार निवडणूक आयोग, आयकर विभाग यांसह विविध विभागाचा गैरवापर करत आहे. यांच्याकडे विकास आणि स्वत:च्या कामाबाबत बोलण्यासाठी काहीही नसल्याने ते विरोधकांना अशाप्रकारे वेठीस धरत आहेत. तसेच भाजप सरकारला येत्या निवडणुकीत स्वत:चा पराभव स्पष्ट दिसत आहेत. त्यामुळे अशाप्रकारे आयकर विभागाची कारवाई करण्यात येत आहे.”
पाहा व्हिडीओ :