अॅडलेड : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 17 डिसेंबरपासून 4 सामन्यांची कसोटी मालिका (IND VS AUS Test Series 2020-21) खेळवण्यात येणार आहे. या आधीच्या एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला आहे. तर टी 20 मालिकेत टीम इंडियाने कांगारुंचा पराभव केला आहे. त्यामुळे ही कसोटी मालिका कोण जिंकणार याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. मात्र त्याआधी पहिल्या कसोटी सामन्यात अंतिम 11 खेळाडूंमध्ये यष्टीरक्षक (विकेटकीपर) म्हणून कोणाला संधी द्यायची असा प्रश्न उभा राहिला आहे. टीम इंडियाकडे 23 वर्षीय ऋषभ पंत (Rushabh Pant) आणि 36 वर्षीय ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) असे 2 विकेटकीपर आहेत. यामुळे हा पेच निर्माण झाला आहे. मात्र प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणला विकेटकीपर म्हणून संधी द्यावी, हा मोठा प्रश्न सध्या कप्तान कोहलीसमोर उभा ठाकला आहे. (IND vs AUS 1st Test : Wriddhiman Saha may be preferred over Pant in day night format)
नुकत्याच झालेल्या सराव सामन्यात वृद्धीमान साहाने त्याचे यष्टीरक्षण कौशल्य दाखवले तर ऋषभने त्याच्या आक्रमक फलंदाजीचं दर्शन घडवलं. सध्या अशी माहिती मिळाली आहे की, अॅडलेडमध्ये होणाऱ्या डे-नाईट कसोटीसाठी साहाच्या विकेटकीपिंगपेक्षा पंतच्या आक्रमक फलंदाजीला कप्तान कोहली झुकतं माप देऊ शकतो.
पहिल्या सराव सामन्यात साहाला तर दुसऱ्या सराव सामन्यात पंतला विकेटकीपिंगची संधी देण्यात आली होती. या दोघांनी विकेटकीपिंगसह फलंदाजीतही दमदार कामगिरी केली आहे. पहिल्या सराव सामन्यात साहाने अर्धशतकी खेळी केली. तर दुसऱ्या सामन्यात पंतने शानदार शतक झळकावलं. यामुळे साहा आणि पंत या दोघांनी पहिल्या सामन्यात विकेटकीपर म्हणून प्रबळ दावेदारी सिद्ध केली आहे. त्यामुळे या दोघांमध्ये विकेटकीपरच्या जागेसाठी चढाओढ पाहायला मिळत आहे.
यष्टीरक्षकाच्या निवडीबाबत भारतीय टीम मॅनेजमेंटने अद्याप कोणतेही संकेत दिलेले नाहीत. टीम इंडियातील सदस्य हनुमा विहारीला याबाबत विचारले असता तो म्हणाला की, दोन्ही खेळाडूंमध्ये सुरु असलेलं हेल्दी कॉम्पिटिशन संघासाठी खूप चांगलं आहे. दरम्यान, काही क्रिकेट समीक्षकांना असं वाटतं की, साहा एक उत्कृष्ट विकेटकीपर आहे तसेच कसोटी क्रिकेटसाठी गरजेची असलेली संरक्षणात्मक फलंदाजी ही साहाची शक्ती आहे. त्यामुळे कप्तान कोहली विकेटकीपर निवडताना साहालाच प्राधान्य देईल.
अवघड परिस्थितीत साहाचं अर्धशतक
साहाने पहिल्या सराव सामन्यात 54 धावांची खेळी केली होती. या खेळीद्वारे त्याने भारताला ऑस्ट्रेलिया ए विरुद्धच्या सामन्यात पराभवापासून वाचवलं होतं. संघाची धावसंख्या 9 बाद 143 होती. अशा वेळी साहाने शेवटचा फलंदाज कार्तिक त्यागीला सोबत घेऊन टीम इंडियाला पराभवापासून परावृत्त केले होते. त्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाज जेम्स पॅटिन्सन, मायकल नेसर, कॅमरन ग्रीन यांच्या गोलंदाजीचा सामना करत धावा जमवत संघातील आपली दावेदारी प्रबळ केली होती.
पंतसमोर ऑस्ट्रेलियन गोलंदाज निष्प्रभ
दुसऱ्या सराव सामन्यात ऋषभ पंतने शानदार शतक झळकावलं होतं. परंतु त्यावेळी भारतीय संघ सुस्थितीत होता. पंतपूर्वी मयांक अग्रवाल, हनुमा विहारी, शुभमन गिल या खेळांडूनी चांगली खेळ करत मोठी धावसंख्या उभारली होती. पंतसमोर लेग स्पिनर मिचेल स्वेपसन आणि कामचलाऊ गोलंदाज निक मॅडिन्सन गोलंदाजी करत होते. ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू अॅलन बॉर्डर यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या या सराव सामन्यातील कामगिरीला लज्जास्पद म्हटलं होतं.
ऑस्ट्रेलियाचा प्रमुख गोलंदाज मिचेल स्टार्क संघात परतला आहे. स्टार्कने कौटुंबिक कारणांमुळे टी 20 मालिकेतून माघार घेतली होती. मात्र आता स्टार्क परतला आहे. यामुळे टीम इंडियाच्या फलंदाजांना स्टार्कसह पॅट कमिन्स, जॉश हेजलवूड, नॅथन लायन या गोलंदाजाच्या भेदक माऱ्याचा सामना करावा लागणार आहे. त्यातच पहिल्या कसोटीनंतर विराट मायदेशी परतणार आहे. यामुळे टीम इंडियाचा कसोटी मालिकेत चांगलाच कस लागणार आहे.
पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड
दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड
तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी
चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन
असा आहे कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराज
संबंधित बातम्या :
(IND vs AUS 1st Test : Wriddhiman Saha may be preferred over Pant in day night format)