कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारत दहाव्या क्रमांकावर, 24 तासात 6977 नवे रुग्ण

| Updated on: May 25, 2020 | 11:28 AM

गेल्या 24 तासात भारतात तब्बल 6 हजार 977 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडली आहे. ही एका दिवसातील सर्वाधिक वाढ मानली जाते. (India Ranks 10th in COVID hit nations)

कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारत दहाव्या क्रमांकावर, 24 तासात 6977 नवे रुग्ण
Follow us on

नवी दिल्ली : देशातील कोविड रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असताना रविवारी भारताने इराणला मागे टाकले. कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत दहाव्या क्रमांकावर गेला आहे. (India Ranks 10th in COVID hit nations)

गेल्या 24 तासात भारतात तब्बल 6 हजार 977 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडली आहे. ही एका दिवसातील सर्वाधिक वाढ मानली जाते. याच कालावधीत 154 कोरोनाबाधित रुग्णांना प्राण गमवावे लागले. सोमवार 25 मे सकाळी 9 वाजेपर्यंतची आकडेवारी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली.

देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 38 हजार 845 वर गेला आहे. यापैकी 77 हजार 103 रुग्णांवर उपचार सुरु (अॅक्टिव्ह केस) आहेत. आतापर्यंत 57 हजार 720 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर एकूण 4021 जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले.

इराणमध्ये आता 1 लाख 35 हजार 701 रुग्ण आहेत. अमेरिकेत सर्वाधिक 16 लाख 86 हजार 436 कोरोनाग्रस्त आहेत. ब्राझील, रशिया, स्पेन, यूके, इटली, फ्रान्स, जर्मनी, तुर्की हे देश भारताच्या पुढे आहेत. गेल्याच आठवड्यात भारताने चीनला रुग्णसंख्येत मागे टाकले.

महाराष्ट्रात 3 हजार 41 नवे कोरोनाग्रस्त कालच्या दिवसात सापडले. यात एकट्या मुंबईतील 1725 रुग्णांचा समावेश आहे. महाराष्ट्राने एकूण 50 हजार रुग्णसंख्येचा टप्पा ओलांडला. तर मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 30 हजारांच्या पुढे गेला आहे. (India Ranks 10th in COVID hit nations)

राज्यात काल दिवसभरात 1196 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत राज्यात 14 हजार 600 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या राज्यात 33 हजार 988 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. काल राज्यात 58 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : महाराष्ट्रात 50 हजारांचा टप्पा पार, दिवसभरात सर्वाधिक 3,041 नवे कोरोना रुग्ण

तामिळनाडूत कालच्या दिवसातील दुसर्‍या क्रमांकाचे म्हणजे 765 नवे रुग्ण सापडले. चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या पश्चिम बंगालमध्ये 208 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर एकूण आकडा 3 हजार 667 वर गेला आहे.