तीन पंतप्रधान, तीन युद्ध जिंकली, आता मोदीही पराक्रम गाजवणार?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

मुंबई:  भारत-पाकिस्तानमध्ये आत्तापर्यंत 3 मोठी युद्धं झाली आहेत. 1965, 1971 आणि 1999, तिन्ही वेळी आपल्या शूर जवानांच्या अतुलनीय कामगिरीच्या बळावर, आपण पाकिस्तानी सैन्याला चारी मुंड्या चित केलं आणि विजयी पताका फडकवली. आत्तापर्यंत भारताच्या 3 माजी पंतप्रधानांच्या कार्यकाळात पाकशी युद्ध झडलं आणि तिन्ही वेळी भारतानं पाकड्यांना चारीमुंड्या चित केलं.आता मोदी चौथे पंतप्रधान ठरणार का? 5 ऑगस्ट 1965 […]

तीन पंतप्रधान, तीन युद्ध जिंकली, आता मोदीही पराक्रम गाजवणार?
Follow us on

मुंबई:  भारत-पाकिस्तानमध्ये आत्तापर्यंत 3 मोठी युद्धं झाली आहेत. 1965, 1971 आणि 1999, तिन्ही वेळी आपल्या शूर जवानांच्या अतुलनीय कामगिरीच्या बळावर, आपण पाकिस्तानी सैन्याला चारी मुंड्या चित केलं आणि विजयी पताका फडकवली. आत्तापर्यंत भारताच्या 3 माजी पंतप्रधानांच्या कार्यकाळात पाकशी युद्ध झडलं आणि तिन्ही वेळी भारतानं पाकड्यांना चारीमुंड्या चित केलं.आता मोदी चौथे पंतप्रधान ठरणार का?

5 ऑगस्ट 1965 युद्ध

पाकिस्तान सातत्याने दहशतवादी कारवाया करत आला आहे. त्यांची ही खोड जुनीच आहे. 1965 सालीही त्यांनी अचानक भारतावर चाल केली होती. 5 ऑगस्ट 1965 रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धाला सुरुवात झाली होती. हे युद्ध 17 दिवस चाललं.
भारताचे 26 हजार सैनिक, पकिस्तानचे 33 हजार सैनिक आमने सामने आले होते. मात्र युद्धात भारताचा विजय झाला होता.

1965 साली पाकिस्ताननं सेनाप्रमुख जनरल अयूब खान यांच्या नेतृत्वाखाली युद्धाची आगळीक केली होती. तर त्यावेळी भारताच्या पंतप्रधानपदी लालबहाद्दूर शास्त्री होते. सीमेवरील पोस्टच्या विवादातून हे युद्ध छेडलं गेलं. या युद्धात पाकिस्तानला अतिआत्मविश्वास नडला. पाकिस्तानची रणनीती होती की कच्छमधून घुसखोरी करत भारताची काश्मीरमध्ये कोंडी करायची. पाकिस्तानकडे त्यावेळी अमेरिकेनं पुरवलेले अत्याधुनिक रणगाडे होते. ज्यात पॅटन एम-47, एम-48 आणि एम-4 रणगाडे आणि शेरमन रणगाडे यांचा समावेश होता. तरीही भारतीय सेनेनं निकराचा प्रतिकार करत काश्मीरमधून पाकिस्तानी सैन्याला पिटाळून लावलं. पाकिस्तानचं ऑपरेशन ग्रँड स्लॅम पार धुळीस मिळवलं. भारतीय सैन्यानं 8 किमी आतपर्यंत पाकव्याप्त काश्मीरमध्ये धडक मारत 17 दिवसांनंतर विजय मिळवला होता.

1971 भारत-पाकिस्तान युद्ध
3 डिसेंबर 1971 रोजी युद्धाला सुरुवात झाली.  हे युद्ध 14 दिवस चाललं. 16 डिसेंबरला पाकिस्तानचे 2 तुकडे झाले. पकिस्तानचे 93 हजार सैनिक शरण आले. युद्धात भारताचा विजय झाला.

3 डिसेंबर 1971 रोजी संध्याकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी पाकिस्तानने भारताच्या 11 हवाई तळांवर हल्ला केला. श्रीनगर, जोधपूर, अंबाला, आग्रा, अवंतीपूर, पठाणकोटवर पाकिस्तानने अचानक हवाई हल्ला केला. हल्ला करुनही पाकिस्तान भारताच्या विमानांना किंवा हवाई तळांना नुकसान पोहोचवू शकला नाही. या हल्ल्यानंतर भारताच्या हवाई दलाने अगदी कमी वेळात पाकिस्तानच्या दोन्ही पश्चिम आणि पूर्व ठिकाणी हल्ले सुरु केले. भारतीय हवाई हल्याने पाकिस्तानचे कंबरडे मोडायला जास्त वेळ लागला नाही.

भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील हंटर, एस. यू. 7 , मिग 21 यांनी काही क्षणात हवेतच पाकिस्तानचे बारा वाजवले. रशियाची या युद्धात भारताला अतोनात मदत झाली. पश्चिम तळावर भारतीय वायूदल एका दिवसात 500 पेक्षा जास्त उड्डाणं भरत होती, जी की दुसऱ्या महायुद्धापेक्षा जास्ती होती.

भारताच्या जिगरबाज सैनिकांपुढे पाकिस्तानने सपशेल शरणागती पत्कारली. 93,000 हून अधिक सैन्यांसह पाकिस्तानचे जनरल ए.ए.खान नियाजी यांनी जनरल जगजितसिंह अरोरा यांच्यापुढे सुहारवर्दी उद्यान ढाका इथे 16 डिसेंबर 1971 रोजी शरणागती पत्कारली. हाच दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधींच्या मुत्सद्दीपणामुळं आणि धाडसी निर्णयामुळं आपण पाकिस्तानची 2 शकलं करु शकलो आणि बांगलादेशाची निर्मिती झाली.

1999 कारगिलचं युद्ध
कारगिल युद्ध हे भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान 1999 च्या उन्हाळ्यात लढले गेलेले मर्यादित युद्ध होते. या युद्धाची व्याप्ती भारताच्या कारगिल आणि आजूबाजूच्या परिसरापुरतीच मर्यादित राहिली, त्यामुळे याला मर्यादित युद्ध म्हणतात.  तसेच यापूर्वीच्या भारत पाक युद्धांप्रमाणेच याही युद्धात, युद्ध सुरू झाल्याची आणि संपल्याची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नव्हती. 1999 च्या उन्हाळ्यात, पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठिकाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले आणि या घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगिलचे युद्ध सुरु झालं.

ही ठाणी कारगिल आणि द्रास परिसरातील अतिउंच दुर्गम जागी होती. अनेक महिन्यांच्या प्रयत्नांनंतर भारताला ही ठाणी परत मिळवण्यात यश मिळालं. हे युद्ध आधुनिक इतिहासातील अतिउंचीवरच्या युद्धाचे उदाहरण होय. तत्कालिन पंतप्रधान अटबिहारी वाजपेयींनी शांततेची बातचीत सुरु केली होती, समझोता एक्स्प्रेसच्या माध्यमातून एकीकडं मैत्रीचा हात पुढे केला होता, मात्र दुसरीकडे पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफांनी भारताच्या पाठीत खंजीर खुपसत घुसखोरी केली होती.

अर्धसैनिक आणि वायूदल मिळून भारताने एकूण 30 हजार सैनिक कारगिलच्या युद्धात वापरले. तत्कालीन वाजपेयी सरकारने ‘ऑपरेशन विजय’ या नावाखाली कारगिलच्या युद्धाची कार्यवाही केली. तोलोलिंगची लढाई आणि टायगर हिलची लढाई ही या युद्धातील सर्वात महत्त्वाची घटना मानली जाते. सरतेशेवटी 4 जुलै रोजी टायगर हिल भारताच्या ताब्यात आलं. या तिन्ही युद्धात भारतानं पाकिस्तानला पाणी पाजलं आणि मोठ्या डौलानं तिरंगा फडकवत विजयी पताका झळकवली.

संबंधित बातम्या 

आमच्यावर भारताकडून हल्ला होण्याची शक्यता, पाकिस्तानची यूएनकडे तक्रार  

मसूद अजहरला दहशतवादी घोषित करण्यासाठी फ्रान्स प्रस्ताव आणणार!