नवी दिल्ली : भारतीय खाद्यसंस्कृती जगभरात नेणारा मास्टरशेफ फ्लॉएड कार्डोज यांचा काल (25 मार्च) कोरोनामुळे मृत्यू झाला (Floyd Cardoz death due to corona) आहे. फ्लॉएड हे 59 वर्षाचे होते. फ्लॉएड यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली आहे. मुळचे भारतीय असलेले फ्लॉएड हे अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये राहत होते. जगभरात शेज फ्लॉएड, बॉम्बे कॅन्टीनसारखे त्यांचे अनेक रेस्टॉरंट आहेत.
फ्लॉएड काही दिवसांपूर्वीच मुंबईतही आले होते. मुंबईत त्यांनी एका पार्टींचंही आयोजन केले होते. पार्टीत एकूण 200 जण असल्याचे म्हटलं जात आहे. 8 मार्चपर्यंत फ्लॉएड भारतात होते. भारतातून अमेरिकेत पोहोचल्यानंतर त्यांना 18 मार्च रोजी कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांना न्यूयॉर्कच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले.
न्यूयॉर्कच्या रुग्णालयात त्यांची तपासणी केली असता त्यांना कोरोना झाल्याचे समोर आले. फ्लॉएड यांनी इस्टाग्रामवर याची माहिती दिली. तसेच इनस्टाग्रामवरील पोस्टमध्ये त्यांनी सर्वांची माफीही मागितली.
जगभरात कोरोना विषाणूची लागण आतापर्यंत 4 लाख 30 हजार लोकांना झाली आहे. तर कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 19 हजारपेक्षा अधिक आहे. जॉन हॉपकिन्स यूनिव्हर्सिटीद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांच्या संख्येत चीन, इटलीनंतर अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर आहे.
अमेरिकेत आतापर्यंत 55 हजारपेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर या भयंकर आजारामुळे अमेरिकेत 800 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 300 लोक यामधून बरे झाले आहेत.