न्यूयॉर्क : अमेरिकेत भारतीय वंशाच्या डॉक्टरने कोरोनाग्रस्त महिलेवर यशस्वी फुफ्फुस प्रत्यारोपण केले. डॉक्टर अंकित भरत यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथकाने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली. (Dr Ankit Bharat America Lungs Transplant)
अमेरिकेतील संबंधित महिलेची फुफ्फुसे कोरोना व्हायरसमुळे पूर्णपणे निकामी झाली होती. शस्त्रक्रियेनंतर तिच्यावर दोन्ही फुफ्फुसांचे प्रत्यारोपण करण्यात आले. ‘कोरोना’चा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर अमेरिकेत झालेली अशा प्रकारची ही पहिली शस्त्रक्रिया मानली जाते.
ऑनलाईन मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोरोनाग्रस्त महिलेची प्रकृती चिंताजनक होती. प्रत्यारोपणाशिवाय तिला वाचवणे अशक्य होते, कारण गेल्या दोन महिन्यांपासून ती हृदय आणि फुफ्फुस यांना कृत्रिमरित्या सहाय्य करणाऱ्या उपकरणांच्या मदतीने श्वासोच्छवास करत होती.
डॉक्टरांच्या टीमचे नेतृत्व करणाऱ्या भारतीय वंशाच्या डॉक्टर अंकित भरत यांनी हे गुंतागुंतीचे ऑपरेशन केले. “कोविडमुळे प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांना वाचवण्यासाठी प्रत्यारोपण हा एकमेव योग्य मार्ग असू शकतो” असं मत डॉक्टर अंकित यांनी शस्त्रक्रियेनंतर व्यक्त केलं.
उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये जन्मलेल्या डॉक्टर अंकित भरत यांनी ही आजपर्यंत आपल्या कारकिर्दीतील सर्वात अवघड शस्त्रक्रिया असल्याचं सांगितलं. “कोरोना व्हायरसमुळे सर्वाधिक परिणाम तुमच्या श्वसन संस्थेवर होतो. परंतु त्याच वेळी मूत्रपिंड, हृदय, रक्तवाहिन्या आणि न्यूरोलॉजिकल सिस्टमलाही बाधा पोहोचवू शकते” असंही ते म्हणाले. (Dr Ankit Bharat America Lungs Transplant)
डॉ अंकित म्हणाले, “मी निश्चितपणे सांगू शकतो की कोरोनामुळे बऱ्याच रुग्णांच्या फुफ्फुसावर गंभीर परिणाम झाले असतील. मात्र प्रत्यारोपणामुळे अनेक जणांचे प्राण वाचू शकतात, असा विश्वास त्यांना वाटतो.
महिलेची प्रकृती इतकी बिकट झाली होती, की तिच्यावर कोणत्याही प्रकारचे अँटीबायोटिक उपायकारक ठरत नव्हते. महिलेच्या फुफ्फुसांची स्थिती ढासळत गेली तसतसे तिची हृदयक्रियेतही अडथळे येऊ लागले आणि त्यानंतर इतर अवयवांना पुरेसे ऑक्सिजन मिळत नव्हते. डॉ. अंकित भरत यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या टीमने केलेल्या यशस्वी फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमुळे महिलेला जीवदान मिळाले.
VIDEO : Dhananjay Munde Corona | धनंजय मुंडेंच्या संपर्कात आलेल्यांनी क्वारंटाईन व्हा- जिल्हाधिकारी https://t.co/FMqRqUk7WK
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 12, 2020