श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बडगाम इथं सुट्टीवर आलेल्या जवानाचं दहशतवाद्यांनी अपहरण केल्याचं वृत्त खोटं आणि चुकीचं असल्याचा दावा भारताच्या संरक्षण मंत्रालयाने केलं आहे. हा जवान सुरक्षित असून तो आपल्या युनिटमध्ये परतला आहे, त्यामुळे संभ्रम पसरवणाऱ्या बातम्या पसरवू नका, असं आवाहन संरक्षण मंत्रालयाने केलं आहे.
जाकली युनिटच्या सुट्टीवर आलेल्या मोहम्मद यासीन या भारतीय जवानाचं दहशतवाद्यांनी घरात घुसून अपहरण केल्याचं वृत्त शुक्रवारी रात्री देशभरात पसरलं होतं. मात्र आज संरक्षण मंत्रालयाने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर याबाबतचं स्पष्टीकरण दिलं आहे.
Clarification. Media reports of the abduction of a serving Army soldier on leave from Qazipora, Chadoora, Budgam are incorrect. Individual is safe. Speculations may please be avoided.@PMOIndia @nsitharaman @DefenceMinIndia @PIB_India @adgpi
— Defence Spokesperson (@SpokespersonMoD) March 9, 2019
“सुट्टीवर आलेल्या सैनिकाचं बडगामच्या काजीपूरा येथून अपहरण झाल्याचं माध्यमातील वृत्त खोटं आहे. हा जवान सुरक्षित आहे”, असं संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे.
मोहम्मद यासीन भारतीय लष्कराच्या जम्मू आणि काश्मीरच्या लाईट इंफ्रंट्री युनिटचे जवान आहेत. ते 26 फेब्रुवारी ते 31 मार्चपर्यंत सुट्टीवर होते. याच दरम्यान त्यांच्या राहत्या घराजवळून त्यांचं अपहरण झाल्याचं वृत्त काल आलं होतं. मात्र आज संरक्षण मंत्रालयाने ट्विट करुन हे वृत्त खोडून काढले आहे.
जवानाच्या अपहरणाच्या वृत्तानंतर भारतीय लष्कराने त्यांच्या शोधात सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं. या विशेष ऑपरेशनअंतर्गत बडगम परिसराला घेरावही घालण्यात आला होता. जवान मोहम्मद यासीन यांना त्यांच्या घराजवळील जंगलाच्या दिशेने नेण्यात आल्याची माहिती यासीन यांच्या कुटुंबियांनी पोलिसांनी दिल्याचं सांगण्यात येत होतं. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं.
यापूर्वीही जम्मू-काश्मीर येथून जवानांच्या अपहरण आणि हत्यांच्या घटना घडल्या आहेत. मे, 2017 मध्ये लष्कर-ए-तोयबा आणि हिज्बुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी अखनूर येथून एका जवानाचे अपहरण केले होते. एका लग्न समारंभातून त्या जवानाचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर त्या जवानाची निघृणपणे हत्या करण्यात आली होती.