मुंबई : बांगलादेशी मूळ असणाऱ्या जीवघेण्या मांगूर माशाने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली आहे (Infiltration of Mangur fish in Maharashtra). आता अखेर मांगूर मत्स्यपालन आणि विक्रीविरोधात कारवाई सुरु झाली आहे. मांगूर हा मत्स्य शौकिनांमध्ये लोकप्रिय असलेला मासा आहे. मात्र, हा मासा इतर माशांना खाऊन त्यांच्या प्रजातींचं अस्तित्व नष्ट करणारा आहे. तसेच या माशाच्या सेवनाने गंभीर आजारांचा धोकाही वाढतो.
मांगूर माशाचा पर्यावरणीय आणि आरोग्यावरील दुष्परिणाम लक्षात घेता महाराष्ट्रात या माशावर बंदीही घालण्यात आली आहे. मात्र, असं असतानाही तो महाराष्ट्रात सर्रास विकला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये गंभीर दुष्परिणाम लक्षात आल्यानं सरकारवर कारवाईसाठी दबाव येत होता. यानंतर सरकारने कडक कारवाई करत त्याच्यावर बंदी घातली. महाराष्ट्रात शेकडो टन मांगूर मासे जप्त केले असून त्यांच्या मत्स्यशेतीवरही बंदी घालण्यात आली आहे.
पुण्यातील इंदापूर तालुक्यात कालठण नंबर 1 मध्ये अवैध मांगूर मत्स्यपालन होत होते. त्यांच्यावर सोलापूर आणि पुणे मत्स्य व्यवसाय विभागाने कारवाई केली. यात शेकडो किलो मांगूर मासे तळ्यातून बाहेर काढून नष्ट करण्यात आले. विशेष म्हणजे हा मासा मासेप्रेमींमध्येही लोकप्रिय आहे. कमी किमतीत स्वादिष्ट मासा मिळत असल्यानं या माशाचा बाजारात मोठा खप आहे. हा मासा पाण्याबाहेर एक तास जिवंत राहत असल्यानं खाणाऱ्यांना जिवंत मासा आपल्यासमोर तयार केला जाणार असं भ्रामक समाधानही मिळतं. मात्र, त्यांना या माशाचे धोके माहित नसतात.
दरम्यान, केंद्रीय हरित लवादाने मांगूर माशाचा मानवी आरोग्यास आणि पर्यावरणाला धोका लक्षात घेतला आहे. त्यामुळेच त्यांनी मांगूर जातीच्या माशाचे उत्पादन, वाहतूक आणि विक्रीवर बंदी घातली. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात मांगूर माशाच्या उत्पादनावर बंदी घातली आहे.
या प्रजातीचे हे मासे भारतात बांगलादेशमार्फत बेकायदा पद्धतीने दाखल होत असल्याचंही बोललं जात आहे. काळ्या मांगूर माशामुळे मानवी आरोग्यासह पर्यावरणावर गंभीर परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे. या माशाचं सेवन केल्यानं अनेक रोगांना बळी पडण्याची शक्यता आहे. त्यात चीनमध्ये सुरु असलेल्या रोगराईच्या पार्श्वभूमीवर देखील सतर्कता बाळगली जात आहे.
थायलंड किंवा आफ्रिकन मांगूर मासा मांसभक्षक असल्याने पर्यावरण आणि आरोग्याला घातक आहे. या माशाला टाकाऊ मांसल पदार्थ टाकले जात असल्याने पर्यावरणालाही ते धोकादायक ठरत आहेत.
संबंधित व्हिडीओ: