पुणे : मुसळधार पावसाने (Pune heavy rain flood) पुण्यातील 14 जणांचा जीव घेतलाय, तर नऊ जण अजूनही बेपत्ता आहेत. बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील पाच तालुक्यांना फटका बसला. शहरासह ग्रामीण भागातील सखल भागातील घरात पाणी शिरलं होतं. या परिस्थितीनंतर प्रशासनाने युद्धपातळीवर पूरग्रस्तांना (Pune heavy rain flood) सुरक्षितस्थळी हलवलं आणि मदतीसाठी एनडीआरएफची पाच पथकं कार्यरत झाली. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष असून सर्व मदत दिली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली.
गेल्या 22 वर्षात पहिल्यांदाच ऑगस्ट महिन्यात धरणं भरली असल्याचं जिल्हाधिकारी म्हणाले. तुलनेने रात्री झालेला पाऊस किती तरी जास्त होता. यावर्षी जिल्ह्यात 180 टक्के पाऊस झाला आहे. बुधवारच्या पावसामुळे जिल्ह्यात 14 जणांचा मृत्यू झाला, ज्यात पुणे शहरातील सहा, हवेली तालुक्यातील सहा आणि पुरंदर तालुक्यातील दोन जणांचा समावेश आहे.
या पावसाचा फटका जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी पाच तालुक्यांना बसला. या पाच तालुक्यातील 59 गावे बाधित झाली. नाझरे धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे कऱ्हा नदीच्या पात्रात 85 हजार क्युसेक पाणी वाहत होतं. कऱ्हा नदीच्या पाण्यामुळे बारामती शहराला फटका बसला. सतर्कतेचा उपाय म्हणून बारामती शहरात 38 निवारा शिबिरांची उभारणी करण्यात आली आहे.
या शिबिरात 2 हजार 500 नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं. तर पुणे शहरातील 3 हजार नागरिकांना काही काळासाठी सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. जिल्ह्यातील 1 हजार 1 कुटुंबांतील 3 हजार 65 लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलं आहे.
पुणे जिल्ह्यात दरड कोसळून 5 रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते. या ठिकाणी तातडीने यंत्रणा पाठवून या रस्त्यांवरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली. जिल्ह्यात एनडीआरएफची पाच पथकं तैनात असून 275 जवान मदतकार्य करत आहेत. त्यापैकी बारामती तालुक्यात एनडीआरएफच्या दोन टीम कार्यरत आहेत. या आपत्कालिन स्थितीची माहिती निवडणूक आयोगाला कळवून त्यांच्या सूचनांनुसार प्रशासनाच्यावतीने बाधित नागरिकांना मदत देण्यात येणार आहे. आचार संहितेचा कोणताही अडसर मदत आणि बचावकार्यात येणार नसल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.