अहमदनगर : महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला (International Women’s Day 2020) जातो. याच दिनाचे औचित्य साधून अहमदनगरला मुलींचा अनोख्या पध्दतीने सन्मान करण्यात आला आहे. घरासमोरील नावाच्या पाटीवर नेहमी कर्त्या पुरुषाचे नाव दिसते. मात्र नगरमध्ये आपल्या मुलीचे नाव घरासमोरील नावाच्या पाटीवर लावण्यात आले आहे.
बेटी बचाओ, बेटी पढाओ’, ‘मुलगी शिकली प्रगती (International Women’s Day 2020) झाली’, ‘लेक वाचवा’, ‘मुलगा-मुलगी एकसमान’, अशा घोषणांतून अनेकदा जनजागृती केली जाते. एकीकडे जनजागृती होत असताना दुसरीकडे मात्र ही घोषणा प्रत्यक्षात आणणारा एक उपक्रम नगरमध्ये आयोजित करण्यात आला.
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होईल? अमृता फडणवीस म्हणतात…
सावेडी आणि तोफखाना परिसरात असलेल्या दोन कॉलनीतील तब्बल 250 घरांवर मुलींच्या नावांचे नामफलक झळकले. मुलगी म्हणजे परक्याचे धन मानले जाते. आई-वडिलांकडे लहानची मोठी झालेली मुलगी विवाहानंतर सासरी जाते. पण त्यानंतर तिचे हळूहळू माहेरचे अस्तित्व कमी-जास्त होत जाते. या पार्श्वभूमीवर लेक वाचवा अभियान अधिक प्रभावीपणे समाज मनावर ठसण्यासाठी येथील अनुलोम संस्थेचे प्रमुख राजेश्वर श्रीराम यांच्या पुढाकाराने श्रीदत्त जन्मोत्सव समिती अंमलात आणली आहे.
या समितीच्या माध्यमातून घरा-घरांवर बालिका नामफलक अनावरण उपक्रम राबवला गेला. तोफखान्यातील पंचरंग गल्लीतील वसाहतीसह सावेडीच्या भिस्तबाग चौकातील सिमला कॉलनीजवळ असलेल्या मधुराज पार्क इमारतीतील घरांवर त्या घरात राहणाऱ्या त्यांच्या मुलींची नावे दिमाखात पाहायला मिळत होती. विशेष म्हणजे घरातील कर्त्या पुरुषाच्या नावाच्यावर या पाट्या लागल्या होत्या.
महिलेची गाडीतच प्रसुती, कर्जतमध्ये आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचा आरोप
दोन्ही वसाहती मिळून 250 हून अधिक घराबाहेर मुलींच्या नावाच्या पाट्या आता झळकत आहेत. या वसाहतीत येणारे अनेक पाहुणे पाट्या पाहून अचंबित होतात. घरावर कुटुंबातील अन्य सदस्यांइतकाच घरातील मुलीचाही अधिकार असल्याचा संदेश यातून दिला जात आहे. तसेच मुलींनी देखील कुटुंबात आपला सन्मान होत असल्याने आनंद व्यक्त केला आहे.
या प्रत्येक घरा-घरांवर बालिका नामफलक पाहून यासाठी शहरात प्रत्येक ठिकाणी मागणी वाढू लागली आहे. तर या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत केलं जाते (International Women’s Day 2020) आहे.