बेस्टच्या ताफ्यात आणखी चार नव्या एसी डबल डेकरचा समावेश, पाहा कोणत्या मार्गावर धावणार

| Updated on: Aug 30, 2023 | 6:41 PM

मुंबईकरांच्या सोयीसाठी आणखी चार दुमजली वातानुकुलित इलेक्ट्रीक बस समाविष्ट केल्याने एकूण दुमजली बसेसची संख्या आता 16 इतकी झाली आहे.

बेस्टच्या ताफ्यात आणखी चार नव्या एसी डबल डेकरचा समावेश, पाहा कोणत्या मार्गावर धावणार
best ac double decker
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई | 30 ऑगस्ट 2023 : बेस्टची आयकॉनिक डबलडेकर नुकतीच वातानुकूलित आणि इलेक्ट्रीकवर धावू लागली. 21 फेब्रुवारी 2023 पासून वातानुकुलित दुमजली इलेक्ट्रीक बसगाडी बेस्टच्या ताफ्यात धावू लागलीय. अशा 12 डबलडेकर इलेक्ट्रीक बस सध्या बस मार्ग क्र. ए-138 आणि ए- 115 या मार्गावर छत्रपती शिवाजी टर्मिनस ते एनसीपीए दरम्यान चालविण्यात येत आहेत. या अत्याधुनिक बससेवेला खूपच चांगला प्रतिसाद मिळत असून आणखीन चार दुमजली वातानुकुलीत इलेक्ट्रीक बस बेस्टच्या ताफ्यात समाविष्ट झाल्या आहेत.

बेस्टच्या ताफ्यात लंडन धर्तीच्या पर्यावरणपूरक इलेक्ट्रीक डबल डेकर समाविष्ट करण्यात आल्या आहेत. या बसने कोणतेही ध्वनी आणि वायू प्रदूषण होत नाही. या इलेक्ट्रीक एसी डबल डेकरला दोन स्वयंचलित दरवाजे आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्याचा फायदा होत आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी याबसमध्ये सीसीटीव्हींची व्यवस्था पुरविली आहे. या दुमजली बसची अंतर्गत रचना आकर्षित असून आसनाशेजारी मोबाईल चार्जिंगची व्यवस्था आहे. या नव्या बसेसना एकमजली वातानुकूलित प्रमाणेच भाडे आकारले जात आहे.

आणखी आठ डबलडेकर 

मुंबईकरांच्या सोयीसाठी आणखी चार दुमजली वातानुकुलित इलेक्ट्रीक बस समाविष्ट केल्याने एकूण दुमजली बसेसची संख्या आता 16 इतकी झाली आहे. 30 ऑगस्टपासून या सर्व दुमजली एसी इलेक्ट्रीक बसेस सकाळी 8.45 वाजल्यापासून दर 30 मिनिटांच्या अंतराने बसमार्ग क्र ए-115 वर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते एनसीपीए या दरम्यान चालविण्यात येत आहेत. बेस्टच्या ताफ्यात लवकरच आणखी आठ वातानुकुलित दुमजली बसेस याच मार्गावर दाखल करण्यात येणार आहेत.

आणखी दहा बस येणार

येत्या काही काळात प्रवाशांच्या सोयीसाठी दुमजली एसी इलेक्ट्रीक बसची संख्या वाढविण्यात येणार आहे. लवकरच कुर्ला आगारातील बसमार्गावर 10 वातानुकुलित इलेक्ट्रीक बसेस चालविण्यात येणार आहेत. देशातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर एसी बसचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले होते. बेस्टच्या डबल डेकर बसेस ही मुंबईची शान असून त्या जुन्या झाल्याने त्यांची देखभाल करणे अवघड बनले आहे. त्यामुळे बेस्टच्या ताफ्यात आता नव्या इलेक्ट्रीक एसी डबल डेकर दाखल होत आहेत.