नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट आहे. आमच्या शहिदांच्या रक्ताच्या एका एका थेंबाचा बदला घेतला जाईल, असा इशारा भारताने पाकिस्तानला दिलाय. तर पाकिस्तानच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या इराणनेही पाकिस्तानला कठोर शब्दात असाच इशारा दिलाय. त्यामुळे पाकिस्तान आता कोंडीत सापडला आहे.
इराणच्या सिस्तान-बलुचिस्तान प्रांतातील खश-झहेदान भागात भीषण दहशतवादी हल्ला करण्यात आला. यामध्ये इराणच्या 23 सैनिकांचा मृत्यू झाला. इराणमध्येही पाकिस्तानविरोधात तीव्र रोष आहे. या पार्श्वभूमीवर इराणचे मेजर जनरल मोहम्मद अल जाफरी यांनी पाकिस्तानला तीव्र शब्दात फटकारत आमच्या सैनिकांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल, असा इशारा दिलाय.
पाकिस्तानने दहशतवाद संपवण्यासाठी आता तरी पुढाकार घेणं गरजेचं आहे. पाकिस्तानला जमत नसेल तर आम्ही यासाठी पुढाकार घेऊन. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार आम्हाला याचा पूर्ण अधिकार आहे, असं म्हणत मोहम्मद अल जाफरी यांनी या हल्ल्याचा बदला घेणार असल्याचा इशारा दिला.
पाकिस्तानप्रेरित दहशतवाद फक्त भारतासाठीच नव्हे, तर जगभरातील अनेक देशांसाठी चिंतेचा विषय आहे. इराणमधील हल्ल्यात 23 सैनिकांच्या मृत्यूसोबत 17 जण गंभीर जखमी आहेत. तर दुसरीकडे भारतातही पुलवामामध्ये पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यात 40 सीआरपीएफचे जवान शहीद झाले.
पुलवामा हल्ल्यानंतर भारतानेही पाकिस्तानला हिशोब चुकता करणार असल्याचा इशारा दिलाय. एका बाजूला भारत, तर दुसऱ्या बाजूला इराण अशी परिस्थिती पाकिस्तानची झाली आहे. जगातील अनेक देशांनी पाकिस्तानला दहशतवाद संपवण्यासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन केलंय. पण पाकिस्तानच्या वागणुकीत फरक पडलेला नाही.
व्हिडीओ पाहा :