मुंबई : देशातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या ईशाचं लग्न नुकतंच मोठ्या थाटात पार पडलं. जगातलं सर्वात महागडं घर अँटिलिया या इमारतीमध्ये हा विवाह सोहळा पार पडला, ज्यासाठी भारतासह जगभरातून दिग्गज पाहुण्यांची उपस्थिती होती. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या लग्नात तब्बल 1.20 लाख फोटो काढण्यात आले. या लग्नातला प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करणारे फोटोग्राफर आता चर्चेचा विषय बनले आहेत.
ईशाचे पती आनंद पिरामल यांनी कर्नाटकातील दावणगेरे येथील विवेक सिकेरा या फोटोग्राफरच्या टीमला हायर केलं होतं. या लग्नात फोटो काढण्यासाठी देशातील दोन कंपन्या हायर करण्यात आल्या होत्या. विवेक सिकेरा आणि त्यांचे बिझनेस पार्टनर शंकर काटवे यांनी 2 आणि 3 डिसेंबरपासून ते 8 आणि 9 डिसेंबरपर्यंत जोधपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमाचेही फोटो काढले. शिवाय 12 डिसेंबरला झालेल्या लग्नाचे फोटो काढण्याची जबाबदारीही या दोघांकडेच होती. वाचा – देशातला सर्वात श्रीमंत व्यक्तीही रडला, कारण तो बाप होता…!
लग्नाची ऑर्डर कशी मिळाली?
फोटोग्राफर विवेक सिकेरा यांनी एका मुलाखतीत ही ऑर्डर कशी मिळाली याबाबत सांगितलं. जून 2018 मध्ये या प्रोजेक्टसाठी कॉल आला होता. हे लग्न ईशा अंबानीचं आहे हे तेव्हा माहित नव्हतं. 1 ते 15 डिसेंबर कोणतीही ऑर्डर घेऊ नका, असं तेव्हा सांगण्यात आलं होतं. फोटोचं कंत्राट देण्यापूर्वी सिकेरा यांची प्रोफाईल मागितली गेली, नंतर सॅम्पल पाहण्यात आल्या आणि ऑक्टोबरमध्ये हा प्रोजेक्ट मिळाला. वाचा – मुकेश अंबानींची मुलगी ईशाच्या लग्नाची खास पत्रिका, किंमत तब्बल…
विवेक यांनी सांगितलं की, त्यांच्या 17 टीम या लग्नासाठी कार्यरत होत्या आणि 1 ते 15 डिसेंबर या काळात 1.20 लाख फोटो काढण्यात आले. या फोटोंनी 30 टीबीची जागा व्यापली आहे. हे सर्व फोटो एका महिन्यात तयार करुन द्यायचे आहेत, असंही विवेक यांनी सांगितलं.
हा प्रोजेक्ट मिळाला तेव्हा ईशा अंबानीचं लग्न आहे असं कुणीही सांगितलं नव्हतं. ‘जिंदगी बन जाएगी’ एवढंच तेव्हा सांगितलं होतं. या लग्नाची फोटोग्राफी करता आल्याचा अभिमान आहे. अंबानींसाठी काम करणं हे एखादं स्वप्न पूर्ण झाल्याच्या कमी नाही, अशी प्रतिक्रिया विवेक यांनी एका मुलाखतीत दिली.
कोण आहेत विवेक सिकेरा?
विवेक हे कर्नाटकातील मंगळुरुत राहतात. 2010, 2011, 2012 आणि 2014 या वर्षाचे ते बेस्ट वेडिंग फोटोग्राफर आहेत. काही वृत्तांनुसार, विवेक कधीकाळी एका पेट्रोल पंपावर नोकरी करायचे. त्यांनी नंतर नोकरी सोडून फोटोग्राफी करण्याचा सल्ला मिळाला. जवळ असलेल्या पैशातून त्यांनी कॅमेरा खरेदी केला आणि फोटोग्राफी सुरु केली. विवेक यांनी आज देशातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या मुलीचं लग्न कव्हर केलंय.