नवी दिल्ली : ‘कोरोना’च्या संकटकाळात भारताने माणुसकी दाखवत इस्रायललाही क्लोरोक्वीन औषधांची निर्यात केली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. अमेरिकेसोबतच भारत शेजारी देशांना मदत करणार आहे. (Israel PM Benjamin Netanyahu thanks Narendra Modi)
‘इस्रायलला क्लोरोक्वीन पाठवल्याबद्दल मी माझे प्रिय मित्र आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. इस्रायलच्या सर्व नागरिकांतर्फे धन्यवाद’ असं ट्वीट नेतान्याहू यांनी केलं आहे.
Thank you, my dear friend @narendramodi, Prime Minister of India, for sending Chloroquine to Israel.
All the citizens of Israel thank you! ???? pic.twitter.com/HdASKYzcK4
— PM of Israel (@IsraeliPM) April 9, 2020
भारताने इस्रायलला पाच टन औषधांची निर्यात केली आहे. यामध्ये मलेरियावरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन गोळ्यांचा समावेश आहे. भारताने पाठवलेलं विमान मंगळवारी इस्रायलमध्ये दाखल झालं. दोन दिवसांनी नेतान्याहू यांनी भारताचे आभार मानले.
इस्रायलमध्ये दहा हजारहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत 86 नागरिक कोरोनामुळे दगावले आहेत. इस्रायलमधील 121 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
नेतान्याहू आणि मोदी यांची 3 एप्रिलला फोनवर चर्चा झाली होती. यावेळी नेतान्याहू यांनी भारताकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा पुरवठा करण्याची मागणी केली होती. तंत्रज्ञानावर आधारित सहकार्य आणि कोरोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी वेगवेगळी पावलं उचलण्यावर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती नेतान्याहू यांनी दिली होती.
Prime Minister Benjamin Netanyahu spoke today by telephone with Indian Prime Minister @narendramodi.
The two discussed technological cooperation as well as the various steps to deal with the spread of the coronavirus.
— PM of Israel (@IsraeliPM) April 3, 2020
हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन काय आहे?
हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे मूळ मलेरियावरील औषध आहे. मलेरियाच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी या गोळया दिल्या जातात. पण सध्या कोरोना व्हायरसवरील उपचारात हे औषध अत्यंत प्रभावी ठरत आहे. त्यामुळे जगभरातून या गोळ्यांची मागणी वाढली आहे.
भारत हा हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा सर्वात मोठा उत्पादक आहे. जगात या औषधांच्या उत्पादनात भारताचा 70 टक्के वाटा आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या उपचारात हे औषध परिणामकारक ठरत आहे.
देशाची दरमहा 40 टन हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन (एचसीक्यू) उत्पादन करण्याची क्षमता आहे. हे 200-200 मिलीग्रामच्या 200 दशलक्ष टॅब्लेटच्या बरोबरीचे आहे. हे औषध ‘रुमेटाइड आर्थराइटिस’सारख्या ‘ऑटो इम्यून’ रोगाच्या उपचारात देखील वापरले जाते, त्यामुळे देशात याची उत्पादन क्षमता चांगली आहे.
मागच्या महिन्यात भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. भारतात उपचारासाठी औषधसाठा शिल्लक राहावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. ‘कोरोना’बाधित अमेरिकेसह शेजारी देशांना माणुसकीच्या नात्याने पॅरासिटामॉल आणि हायड्रॉक्सीक्लोरोक्विन पुरवणार असल्याचं भारताने आता सांगितलं आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक देशांना तातडीने या औषधांची गरज आहे
संबंधित बातम्या :
‘नरेंद्र मोदी ग्रेट!’ डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा बदलली, भारताने निर्यातबंदी उठवताच नरमाई
भारताने हनुमानाप्रमाणे संजीवनी द्यावी, ब्राझीलच्या अध्यक्षांचं मोदींना पत्र
(Israel PM Benjamin Netanyahu thanks Narendra Modi)