Mission Chandrayaan-2 : मिशन ‘चंद्रयान 2’ फतेह, चंद्रयान अवकाशात झेपावलं

| Updated on: Jul 22, 2019 | 3:49 PM

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (Indian Space Research Organisation, ISRO) महत्त्वाकांशी मिशन 'चंद्रयान-2' चं (Mission Chandrayaan-2) श्रीहरीकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण झाले आहे.

Mission Chandrayaan-2 : मिशन चंद्रयान 2 फतेह, चंद्रयान अवकाशात झेपावलं
Follow us on

Mission Chandrayaan-2 श्रीहरीकोटा : भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (Indian Space Research Organisation, ISRO) महत्त्वाकांशी मिशन ‘चंद्रयान-2’ चं (Mission Chandrayaan-2) श्रीहरीकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण झालं आहे. सोमवारी (22 जुलै) दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी ‘चंद्रयान-2’ चं प्रक्षेपण झालं. त्यानंतर 16 मिनिटांनी चंद्रयान-2 बाहुबली रॉकेटपासून वेगळे होऊन पृथ्वीच्या कक्षेत फिरण्यास सुरुवात झाली. पुढील 48 दिवसांचा प्रवास करुन चंद्रयान-2 चंद्राच्या दक्षिण धृवावर पोहचेल. जेथे याआधी कोणीही पाऊल ठेवलेलं नाही.

यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी या मोहिमेत काम करणाऱ्या सर्व टीमचं अभिनंदन केलं. तसंच त्यांच्या मेहनतीचं कौतुक केलं. सिवन म्हणाले, “चंद्रयानचं यशस्वी प्रक्षेपण झालं आणि सॅटेलाईट यशस्वीरित्या पृथ्वीच्या बाहेरील कक्षेत सोडण्यात आलं. मागील 7 दिवसांपासून इस्रोच्या टीमनं न थांबता काम केलं. मागील दिड वर्षात सॅटेलाईट टीमने राष्ट्रीय समितीनं केलेल्या सुचनेप्रमाणं काम करत ही मोहिम यशस्वी केली.”

चंद्रयान-2 चा पुढील 48 दिवसांचा प्रवास आणि वेगवेगळे टप्पे

  • 22 जुलै ते 13 ऑगस्ट – चंद्रयान-2 अंतराळ यान या काळात पृथ्वीच्या कक्षेत चक्कर मारेल.
  • 13 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट – चंद्राच्या दिशेला जाणाऱ्या कक्षेत प्रवास करेल.
  • 19 ऑगस्ट – यान चंद्राच्या कक्षेत पोहचेल. यानंतर 13 दिवसांनी पुढील टप्पा.
  • 31 ऑगस्ट – यान चंद्राचे चक्कर मारण्यास सुरुवात करेल.
  • 1 सप्टेंबर – विक्रम लँडर ऑर्बिटरपासून वेगळं होऊन चंद्राच्या दक्षिण ध्रुवाकडे जाण्याचा प्रवास सुरु करेल. यानंतर 5 दिवस प्रवास.
  • 6 सप्टेंबर – विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिणी ध्रुवावर उतरेल. लँडिंगनंतर जवळपास 4 तासांनंतर रोवर प्रज्ञान लँडरमधून बाहेर पडून वेगवेगळे नमुने गोळा करण्यासाठी आणि प्रयोग करण्यासाठी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.

याआधी 15 जुलैला ‘चंद्रयान-2’ चं प्रक्षेपण होणार होतं. पूर्ण तयारीही झाली होती. मात्र, ऐन प्रक्षेपणावेळी तांत्रिक अडचणीमुळे हे प्रक्षेपण रद्द करण्यात आलं. त्यानंतर इस्त्रोने या प्रक्षेपणातील सर्व तांत्रिक अडचणी दूर करत सोमवारी दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी ‘चंद्रयान-2’ चं प्रक्षेपण केलं.

इस्रोचे प्रमुख डॉ. के. सिवन (Dr K. Sivan) यांनी ‘चंद्रयान-2’ च्या प्रक्षेपणातील सर्व तांत्रिक अडचणी दूर केल्याचीही माहिती दिली होती. या मोहिमेकडे भारतासह परदेशी माध्यमांचंही लक्ष लागलं असून ही मोहीम आव्हानात्मक समजली जात आहे.

15 मजली उंच ‘बाहुबली’ने प्रक्षेपण

‘चंद्रयान-2’ चं प्रक्षेपण भारताच्या सर्वात शक्तिशाली जीएसएलवी मार्क-III (GSLV MK-III) रॉकेटने करण्यात आले. या रॉकेटला ‘बाहुबली’ नाव देण्यात आलं आहे. रॉकेट बाहुबलीचं वजन 640 टन आहे. हे रॉकेट भारतातील आतापर्यंतचे सर्वात उंच रॉकेट आहे. याची उंची 44 मीटर म्हणजेच 15 मजली इमारती इतकी आहे. हे रॉकेट 4 टन वजनाच्या सॅटेलाईटला अवकाशात घेऊन जाण्यास सक्षम आहे. यात 3 टप्प्याचे इंजिन आहे. 

मोहिमेची वैशिष्ट्ये काय?

  • चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारी पहिली अवकाश मोहीम
  • स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित पहिली भारतीय मोहीम
  • चंद्राच्या पृष्ठभागावर पोहचणारा भारत चौथा देश होणार

चंद्राच्या कधीही न पाहिल्या गेलेल्या क्षेत्रावरही भारताचं पाऊल

जीएसएलवी मार्क-III 3.8 टनाच्या चंद्रयान-2 स्‍पेसक्राफ्टला घेऊन जात आहे. बाहुबली रॉकेटच्या निर्मितीसाठी 375 कोटी रुपये खर्च आला आहे. या रॉकेटने प्रक्षेपणानंतर जवळपास 16 मिनिटांमध्ये ‘चंद्रयान-2’ ला पृथ्‍वीच्या 170×40400 मिलोमीटर कक्षेत पोहचवले. ही भारताची महत्त्वकांक्षी मोहीम आहे. ‘चंद्रयान-2’ चंद्रावरील दक्षिण ध्रुवावरील क्षेत्रात पोहचणारे आणि माहिती गोळा करणारे पहिले स्पेसक्राफ्ट असेल. याआधी या भागात कोणतेही स्पेसक्राफ्ट गेलेले नाही.

चंद्रयान-2 मोहिमेचे तीन टप्पे 

चंद्रयान-2 मोहिमेमध्ये तीन टप्पे असणार आहे. या तिन्ही टप्प्यांचा या मोहिमेत महत्त्वाचा वाटा असेल. यातील पहिला भाग लँडरचे नाव विक्रम ठेवण्यात आले आहे. याचे वजन 1400 किलो आणि लांबी 3.5 मीटर आहे. यात 3 पेलोड (वजन) आहेत, ज्याचा उपयोग चंद्रावर उतरल्यानंतर रोवरला स्थिर करण्यासाठी होईल. मोहिमेचा दुसरा भाग ऑर्बिटर आहे. याचे वजन 3500 किलो आणि लांबी 2.5 मीटर आहे. याच्यासोबत 8 पेलोड आहेत. ऑर्बिटर या पेलोडसह चंद्राच्या परिक्रमा करेल. तिसरा भाग रोवर असून याचे वजन 27 किलो आहे. रोवर सोलर एनर्जीवर चालेल आणि आपल्या 6 पायांसह चंद्राच्या पृष्ठभागावर फिरुन येथील काही नमुणे गोळा करेल.

मोहिमेतील आव्हाने काय?

पृथ्वीपासून चंद्राचे अंतर जवळपास 3,844 लाख किमी आहे. त्यामुळे पृथ्वीवरुन कोणताही संदेश पाठवल्यास तो चंद्रावर पोहचण्यास काही मिनिटं वेळ लागणार आहे. तसेच, सोलर रेडिएशनचाही ‘चंद्रयान-2’ वर दुष्परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सिग्नल कमकुवत होऊ शकतं.

दरम्यान, 10 वर्षांपूर्वी ऑक्टोबर 2008 मध्ये ‘चंद्रयान-1’ ला प्रक्षेपित करण्यात आलं होतं. यात एक ऑर्बिटर आणि इम्पॅक्टर होता, मात्र रोवर नव्हता. ‘चंद्रयान-1’ चंद्राच्या कक्षेत गेले, मात्र चंद्रावर उतरले नाही. हे स्पेसक्राफ्ट चंद्राच्या कक्षेत 312 दिवस राहिले. या मोहिमेत चंद्राबाबतच्या माहितीची काही आकडेवारीही पाठवली होती. या मोहिमेत पाठवलेल्या माहितीमुळेच चंद्रावर बर्फाचे पुरावे मिळाले होते.

संबंधित बातम्या : 

‘चंद्रयान-2’चं लाँचिंग स्थगित, तांत्रिक अडचणीमुळे इस्रोने 56 मिनिटांपूर्वी लाँचिंग थांबवलं

इंजिनमधील गळतीमुळे ‘चंद्रयान-2’ चं प्रक्षेपण स्थगित

मिशन चंद्रयान 2: बाहुबली सज्ज, काऊंटडाऊन सुरु

VIDEO :