चेन्नई: दाक्षिणात्य सिनेमाच्या स्क्रीप्टप्रमाणे आयकर विभागाने टाकलेल्या धाडीचा थरार तामिळनाडूत पाहायला मिळाला. एकाच वेळी तीन ज्वेलर्सवर छापा टाकून, आयकर विभागाने शेकडो कोटींचा खजाना जप्त केला. मात्र हा खजाना शोधण्यासाठी त्यांना स्मशानभूमीतही खड्डा खणावा लागला. पैशांची हेराफेरीपासून कॉम्प्युटरमधील डाटा लपवणं, मग एखाद्या डिलिव्हरी व्हॅनमधून शहराबाहेर पैसे, सोने घेऊन जाणं, पोलिसांना किंवा आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना हे सोनं सापडू नये म्हणून स्मशानात खड्डा काढून सर्व ऐवज लपवून ठेवणं हा सर्व प्रकार एखाद्या कथेला शोभावा असाच आहे. मात्र हा प्रकार प्रत्यक्षात तामिळनाडूत घडला आहे.
काय आहे प्रकरण?
आयकर विभागाने जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तामिळनाडूतील जी एस स्क्वेअर्स, लोटस ग्रुप आणि सरावाना स्टोअर्स या तीन कंपन्यांवर एकाचवेळी धाडी टाकण्यात आल्या. प्रसिद्ध ज्वेलर्स लोटस ग्रुप व जी स्क्वेअर्सच्या जवळपास 72 कार्यालयांवर छापेमारी केली होती. चेन्नई आणि कोईंबतूर परिसरात हे छापे टाकण्यात आले होते. तीनही कंपनीच्या मालकांनी पैसे, हिरे, दागिने स्मशानात लपवले होते.
433 कोटी रुपयांचा खजाना
28 जानेवारी रोजी टाकलेल्या छाप्यांमध्ये अधिकाऱ्यांना काहीही मिळालं नव्हतं. त्याचं कारण म्हणजे, काही पोलिसांनी याबाबतची माहिती कंपनीच्या मालकांना दिली होती. छाप्याची माहिती मिळताच, तीनही कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त पैसे, सोने आणि हिरे एका कारमध्ये भरुन ती कार घेऊन सुसाट सुटले. या कारमध्ये जवळपास 433 कोटी रुपयांचा मुद्देमाल होता.
स्मशानात सोनं
या छापेमारीदरम्यान आयकर अधिकाऱ्यांना एक गाडी चेन्नईच्या रस्त्यांवर सतत चकरा मारत असल्याची माहिती मिळाली. या गाडीत काळा पैसा आणि दाग-दागिने असल्याचं सांगण्यात आलं. पोलिसांच्या मदतीने ही गाडी जेव्हा पकडण्यात आली, तेव्हा त्यामध्ये काहीच मिळालं नाही. ड्रायव्हरकडे पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर, तो पोपटासारखा बोलू लागलं. जवळच्याच स्मशानात सर्व खजाना लपवल्याची माहिती त्याने दिली.
यानंतर आयकर अधिकाऱ्यांनी ड्रायव्हरने सांगितल्याप्रमाणे स्मशानात खोदकाम केलं. त्यावेळी अधिकाऱ्यांना 25 कोटी रुपयांची रोकड, 12 किलो सोने आणि 626 कॅरेटचे हिरे सापडले.
नऊ दिवसांनी ऑपरेशन संपलं
दरम्यान, 28 जानेवारीला सुरु झालेलं हे सर्च ऑपरेशन 9 दिवसांनी संपलं. या ऑपरेशननंतर आयकर अधिकारी सध्या कॉम्प्युटरमधून डिलीट करण्यात आलेला डाटा परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.