भारतीयांचे फोटो मीम्स पाहून इवान्का ट्रम्पही अवाक, ट्विटरवरील मीम्स पाहून म्हणाली…

| Updated on: Mar 02, 2020 | 10:17 AM

इवान्का यांच्या ताजमहालसोबत काढलेल्या फोटोंचे अनेक मीम्स तयार झाले आहेत. विशेष म्हणजे हे मीम्स पाहून इवान्का ट्रम्प देखील आवाक झाल्या.

भारतीयांचे फोटो मीम्स पाहून इवान्का ट्रम्पही अवाक, ट्विटरवरील मीम्स पाहून म्हणाली...
Follow us on

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या संपूर्ण कुटुंबासह भारत दौऱ्यावर येऊन गेले. यात त्यांची मुलगी इवान्का ट्रम्प देखील होती. इवान्का ट्रम्प यांनी जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालला देखील भेट दिली. या ठिकाणी त्यांनाही फोटो घेण्याचा मोह आवरला नाही. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. मात्र, आता त्या अमेरिकेत परत गेल्या असतानाही त्यांचा हा दौरा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. इवान्का यांच्या ताजमहालसोबत काढलेल्या फोटोंचे अनेक मीम्स तयार झाले आहेत. विशेष म्हणजे हे मीम्स पाहून इवान्का ट्रम्प देखील आवाक झाल्या आणि त्यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे (Ivanka Trump on her Memes).

इवान्का ट्रम्प आपला दुसरा भारत दौरा पूर्ण करुन अमेरिकेत परतल्या. यानंतर भारतीयांनी खास भारतीय स्टाईलने त्यांच्या फोटोंचे मीम्स बनवले आहेत. यात गँग्ज ऑफ वासेपूरमधील सरदार खानच्या व्यक्तीरेखेपासून तर अगदी दिलजीतपर्यंत अनेकांचे एडीटेड फोटो दिसत आहेत. यात कुणी इवान्काच्या मांडीवर बसलं आहे, तर कुणी त्यांच्या गळ्यात हात घातला आहे. एका फोटोत तर इवान्का चक्क एका सायकलवर मागे बसलेल्या दिसत आहेत. या सर्वच फोटोंनी सोशल मीडियावर तुफान धुमाकुळ घातला आहे.


पंजाबी सुपरस्टार दिलजीत दोसांझने त्याचं आणि इवान्का ट्रम्प यांचं असंच एक मीम ट्विटरवर शेअर केलं. यात तो आणि इवान्का ताजमहालच्या समोर बसले आहेत. दिलजीतचा फोटो असा काही इडीट करण्यात आला आहे की जसा तो इवान्का यांच्या मांडीवर बसला आहे. दिलजीतनं हे मीम शेअर करताना लिहिलं, “मी आणि इवान्का… ताजमहालला जायचं, ताजमहालला जायचं म्हणून मागेच लागली… मग काय मी घेऊन आलो.”


दिलजीतने गमतीचा भाग म्हणून हे मीम शेअर केलं, मात्र या मीमची दखल थेट इवान्का ट्रम्प यांनी घेतली. त्यांनी हे मीम रिट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली. इवान्का ट्रम्प म्हणाल्या, “मला ताजमहाल पाहायला घेऊन गेलात त्यासाठी धन्यवाद दिलजीत दोसांझ. हा एक असा अनुभव होता जो मी कधीही विसरु शकणार नाही.”

आणखी एका ट्विटमध्ये एका पत्रकाराने इवान्का यांचे तीन मीम्स शेअर केले. यात गँग्ज ऑफ वासेपूरचा सरदार खानने (मनोज वाजपेयी) इवान्का ट्रम्प यांचा हात पकडलेला आहे. दुसऱ्या एका मीममध्ये इवान्का सायकलवर बसलेल्या दिसत आहेत. यावरही इवान्का यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “मला भारतीय लोकांच्या या उत्साहाचं खूप कौतुक वाटतं. या भारत दौऱ्यात मला अनेक नवे मित्र मिळाले आहेत.”

अशाप्रकारे इवान्का यांच्या या भारत दौऱ्यानंतरही त्या भारतात आणि आता परदेशातही चर्चेत आहेत.

Ivanka Trump on her Memes