टोक्यो : जपानचे पंतप्रधान शिंजो आबे पदावरुन पायउतार झाले आहेत. वैद्यकीय कारणास्तव आबे यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत असल्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. यावेळी विनम्रपणे झुकून त्यांनी जपानी जनतेची माफी मागितली. (Japan prime minister Shinzo Abe announces to step down due to health problems from ulcerative colitis)
आपले आजारपण कोणत्याही निर्णय प्रक्रियेच्या आड येऊ नये, अशी आपली इच्छा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधानपदाचा कालावधी पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल जपानी नागरिकांची दिलगिरी त्यांनी व्यक्त केली.
65 वर्षीय शिंजो आबे गेल्या अनेक वर्षांपासून ‘अल्सरेटिव्ह कोलायटीस’ या आतड्यांसंबंधी आजाराने त्रस्त आहेत. परंतु अलिकडे आपली प्रकृती आणखी बिकट झाल्याचे ते म्हणाले. आबे यांच्या आतड्याला आलेल्या सुजेमुळे अल्सर झाल्याची माहिती आहे. त्यावर उपचार सुरु असून त्यामुळे पंतप्रधानपदाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले.
“कार्यकाळ संपण्यास एक वर्ष बाकी असताना राजीनामा दिल्याबद्दल जपानी नागरिकांची दिलगिरी व्यक्त करतो. विशेषतः कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर विविध धोरणे अद्याप लागू होण्याच्या प्रक्रियेत आहेत, अशा वेळी आपण पायउतार झालो” असं म्हणत त्यांनी पारंपरिक जपानी पद्धतीनुसार वाकून जनतेला नमन केले.
शिंजो आबे गेल्या वर्षीच सर्वात दीर्घ काळासाठी जपानचे पंतप्रधानपद भूषवणारे व्यक्ती ठरले होते. त्यांचा सध्याचा कार्यकाळ 2012 मध्ये सुरु झाला. म्हणजेच गेली आठ वर्ष त्यांनी जपानच्या पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली. उत्तराधिकारी निवडला जाईपर्यंत ते आपल्या पदावर राहतील. सप्टेंबर 2021 मध्ये त्यांच्या पदाचा कार्यकाळ संपणार होता.
अल्सरेटिव्ह कोलायटीसशी झगडताना 2007 मध्येही त्यांनी पंतप्रधानपदाच्या आधीच्या कार्यकाळात अचानक राजीनामा दिला होता. हा आजार त्यांना किशोरवयीन काळापासूनच जडला आहे.
शिंजो आबे हे एक कट्टर पुराणमतवादी आणि राष्ट्रवादी नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. ‘आबेनॉमिक्स” (Abenomics) म्हणून त्यांचे आक्रमक आर्थिक धोरण ओळखले जाते.
BREAKING: Shinzo Abe, Japan’s longest-serving prime minister, officially announces that he will step down due to health problems from ulcerative colitis. pic.twitter.com/9BhCa5LUB9
— The Japan Times (@japantimes) August 28, 2020