कोल्हापूर : हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का असूनही घराबाहेर फिरणाऱ्यांना न्यायालयाने (Home Quarantine Youth send jail by Jaysingpur court ) चांगलाच इंगा दाखवला. होम क्वारंटाईन असूनही बाहेर फिरणाऱ्या दोघांना जयसिंगपूर न्यायालयाने एक महिन्याची कैद आणि दोन हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. इतकंच नाही तर संचारबंदीचे उल्लंघन करुन मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या सात जणांवर दंडात्मक कारवाईचे आदेशदेखील न्यायालयाने दिले. त्यामुळे विनाकारण बाहेर पडाल तर यापुढे जेलची हवा खायला लागू शकते हे यावरुन दिसून येतं. (Home Quarantine Youth send jail by Jaysingpur court )
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू आहे. लॉकडाऊनमुळे मुंबई-पुणे किंवा बाहेरगावातून मूळगावी परतलेल्या अनेकांच्या हातावर स्थानिक प्रशासनाने होमकॉरंटाईनचे शिक्के मारले आहेत. अशा लोकांना घरातून बाहेर पडायला बंदी असतानाही, शिरोळ येथील निखिल खडसे आणि धरणगुत्ती येथील गणेश कुंभार सुट्टीची मजा घेण्यासाठी घराबाहेर पडले होते. मात्र यापुढची सुट्टी त्यांना जेलमध्ये घालवावी लागणार आहे.
कारण विनाकारण बाहेर फिरणाऱ्या या दोघांवर शिरोळ पोलिसांनी कारवाई केली. या दोघांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जयसिंगपूर न्यायालयासमोर हजर केल्यानंतर, न्यायालयाने या दोघांना एक महिन्याची कैद सुनावली. इतकच नाही तर संचारबंदीत मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या सात जणांनाही दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
त्यामुळे नियमांचे उल्लंघन करून आणि यंत्रणेचा डोळा चुकवून जर बाहेर पडत असाल तर तुमच्यावरही जेलमध्ये लॉकडाऊन होण्याची वेळ येऊ शकते.