उस्मानाबादः प्रतापराव गुजर (Prataprao Gujar) यांच्या नेसरी येथील खिंडीतील बलिदानावर आधारलेल्या वेडात मराठे वीर दौडले सात (Vedat marathe veer daudale saat) या चित्रपटावरूनही आता राजकीय वाद पेटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी या वादावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ओपन चॅलेंज दिले आहे. वेडात मराठे वीर दौडले … किती हे माहिती नसल्याचं वाक्य इतिहासकार गजानन मेहंदळे यांच्या तोंडून वदवून घ्या.. असं आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी केलंय.
राज ठाकरे काल कोकण दौऱ्यावर होते. यावेळी त्यानी इतिहासकार जयसिंग पवार यांची भेट घेतली. वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटावरील वादावर त्यांनी यावेळी भाष्य केलं. नेसरी खिंडीत त्यावेळी झालेल्या लढाईत प्रतापराव गुजर यांच्यासोबत नेमके किती जण होते, हे इतिहासकार गजानन मेहंदळेही सांगू शकणार नाहीत. जगात कुठेच याची नोंद नाही, असा दावा राज ठाकरे यांनी केला.
यालाच आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर येथील भवानी मंदिरात जितेंद्र आव्हाड दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटातील वादावर भाष्य करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘
प्रतापराव गुजरांचा इतिहास बघितला तर पहिली लढाई उमराणेची लढाई होती. बेहलोलखान हा त्यांच्याविरुद्ध उभा राहिला होता.
जानकी नावाची मुलगी ही छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम 1 यांची बायको होती. प्रतापराव गुजर हे तिचे नातेवाईक होते. पण बेहलोल खानला पराभूत केल्यानंतर गुजर यांनी त्याला कैद न करता सोडून दिलं.
हा शिवाजी महाराजांना निर्णय आवडला नव्हता. ते प्रतापराव गुजरांच्या मनाला लागलं आणि त्यांनी म्हणावी तशी तयारी न करता बेहलोल खानला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.
त्यावेळी गुजर यांच्यासोबत सात वीर होते. सात मराठा तिथे लढले. हे सगळीकडे लिहिलेलंय. तसं पत्रही आहे. समकालीन कवींनीही हे लिहिलंय, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
पण राज ठाकरे म्हणतात की, सात वीर होते, याचा उल्लेख कुठेही नाही. मी राज ठाकरेंना ओपन चॅलेंज देतो इतिहासकार मेहंदेळेंच्या तोंडून हे काढून दाखवा. सहा-सात-आठ वीर होते, हे माहितीच नाही आम्हाला….
जितेंद्र आव्हाड यांच्या आव्हानाला राज ठाकरे काय उत्तर देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.