मुंबई | 7 फेब्रुवारी 2024 : मंगळवार, 6 फेब्रुवारीची संध्याकाळ महाराष्ट्राच्या राजकारणात कायम लक्षात राहील अशी… महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर निकाल जाहीर करत मोठा आणि ऐतिहासिक असा निर्णय दिला. निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह दिलं, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचा मोठा पराभव झाला. या निकालाने एकच खळबळ माजली. हा निकाल शरद पवार गटासाठी मोठा झटका मानला जात असून त्यांच्या गटातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.
याच निकालाच्या पार्श्वभूमीवर आता शरद पवार गटाचे नेते, जितेंद्र आव्हाडांनी काही ट्विट करत अजित पवारांवर निशाणा साधला आहे. ‘जो नाही झाला काकांचा, तो काय होणार लोकांचा’ असं लिहीत आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली.
जो नाही झाला काकांचा
तो काय होणार लोकांचा#सूर्याजी_पिसाळ— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 6, 2024
एवढंच नव्हे तर ‘ भीड में रहकर भी तनहा कौन है, ये तो झुठे से झुठा भी बतादेगा सच्चा कौन हैं | भेडीयों की भीड में शेर आने दो, पता चलेगा जंगल का राजा कौन है ‘ असं ट्विटही त्यांनी केलं. त्यापुढे त्यांनी शरद पवार यांचा हॅशटॅग वापरत त्यांच्याकडे अजूनही लढण्याची ताकद असल्याचे सूचित केले.
भीड में रहकर भी तनहा कौन है
ये तो झुठे से झुठा भी बतादेगा सच्चा कौन हैं
भेडीयों की भीड में शेर आने दो
पता चलेगा जंगल का राजा कौन है#SharadPawar #लढेंगे_जीतेंगे
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 6, 2024
निकाल जाहीर होताच शरद पवार गटाची मोठी घोषणा
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून नवी घोषणा जाहीर करण्यात आली. निवडणूक आयोगाकडून निकालानंतर नवी मोहीम जाहीर करण्यात आली आहे. आमचा पक्ष आणि चिन्ह शरदचंद्र गोविंदराव पवार असं मोहीमेचं नाव आहे. शरद पवार गटाकडून या नव्या मोहीमेची माहिती ट्विटरवर देण्यात आली आहे. नुकतंच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली. आमचा पक्ष आणि चिन्ह म्हणजे शरद पवार, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
शरद पवार गट ‘हे’ चिन्ह घेऊन मैदानात उतरणार
शरद पवार यांच्या हातून निवडणूक आयोगाने पक्ष काढून घेतला आहे. चिन्हही काढून घेतलं आहे. ज्याने पक्षाला जन्म दिला, पक्ष वाढवला, त्यांच्या हातूनच त्यांचा पक्ष काढून घेण्यात आला आहे. त्यामुळे शरद पवार गटाने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. दिल्लीत वकिलांशी चर्चा सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी ही खलबतं सुरू आहेत. निवडणूक आयोगाने आज दुपारी 4 वाजेपर्यंत शरद पवार गटाला पक्षाची तीन नवीन नावे सूचवण्यास सांगितलं आहे. तसेच तीन नवी चिन्हही द्यायला सांगितली आहेत. त्यामुळे पवार गटाकडून आज पक्षाचं नवं नाव आणि चिन्ह सुचवलं जाणार आहे. शरद पवार गट उगवता सूर्य हे चिन्ह घेण्याची शक्यता आहे. हे चिन्ह घेऊन पवार गट राज्यात पुन्हा नव्याने आपला श्रीगणेशा करण्याची शक्यता आहे.