अमित शाहांचं विमान उडवण्यासाठी कारगील हिरोचा ‘फेक मेल’

| Updated on: Aug 27, 2019 | 8:08 PM

वायूसेनेच्या एका माजी वैमानिकावर गृहमंत्री अमित शाहांचं विमान उडवण्यासाठी आपल्या ओळखीत बदल केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सीमा सुरक्षा दलाने (BSF) या वैमानिकाविरोधात चौकशी सुरू केली आहे.

अमित शाहांचं विमान उडवण्यासाठी कारगील हिरोचा फेक मेल
Follow us on

नवी दिल्ली : वायूसेनेच्या एका माजी वैमानिकावर गृहमंत्री अमित शाहांचं विमान उडवण्यासाठी आपल्या ओळखीत बदल केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सीमा सुरक्षा दलाने (BSF) या वैमानिकाविरोधात चौकशी सुरू केली आहे. विशेष म्हणजे सांगवान यांना 1999 मध्ये कारगील युद्धात मिग-21 उडवण्यासाठी पदकाने सन्मानित केलेलं आहे.

विंग कमांडर (रिटायर्ड) जे. एस. सांगवान यांनी आपल्या वरिष्ठांच्या नावाने स्वतः लार्सन अँड टूब्रोला (L&T) ईमेल पाठवले, अशी माहिती गृहमंत्र्यांच्या विमानाचे व्यवस्थापन करणाऱ्या BSF एअरविंगला मिळाली आहे. ‘द इंडियन एक्‍सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार सांगवान यांनी स्वतःच स्वतःची शिफारस केली आणि व्हेरिफिकेशन कॉलसाठी देखील स्वतःचाच नंबर दिला.

L&T ला पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले होते, “सांगवान पायलट-इन-चीफ आहेत. त्यांना 4,000 हून अधिक तास विमान चालवण्याचा अनुभव आहे. सांगवान यांना L&T एअरक्राफ्ट चालवण्यास द्यावे.”

एका फोनने BSF पायलटचे गुपित उघड

L&T ने सांगवान यांना जुलैमध्ये चेन्‍नई-दिल्‍ली-मुंबई फ्लाईट चालवण्याची परवानगी देखील दिली. मात्र, सांगवान चेन्‍नईला रवाना होण्याआधी एक दिवस त्याचा पर्दाफाश झाला. L&T ने काही स्पष्टीकरणासाठी BSF एअरविंगला फोन केला. त्यावेळी मिळालेली माहिती धक्कादायक होती. BSF ने L&T ला आपण कुणाचीही शिफारस केली नसल्याचे स्पष्ट केले. तसेच सांगवानला पायलट इन कमांड (PIC) तर दुरच, पण को-पायलट म्हणून देखील दर्जा दिलेला नाही, असंही सांगण्यात आलं.

BSF ने या प्रकरणी तपास सुरू केला आहे. अधिकाऱ्याने गृहमंत्र्यांचं विमान उडवता यावं म्हणून आकडेवारीत फेरफार केला. कोणत्याही अतिमहत्त्वाच्या व्यक्तीचे (VIP) विमान उडवण्यासाठी पायलटला कमीत कमी 500 तास विमान उडवण्याचा अनुभव असणं आवश्यक असतं. गृहमंत्र्यांचं विमान उडवण्यासाठी तर 1,000 तासांहून अधिक अनुभव बंधनकारक असतो.