तीन दिवसात माफी मागा, अन्यथा घरात घुसून मारु, करणी सेनेची जावेद अख्तर यांना धमकी

| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

मुंबई : गीतकार जावेद अख्तर यांना राजस्थानच्या राजपूत करणी सेनेने धमकी दिली आहे. जावेद अख्तर यांनी केवळ बुरखाच नव्हे तर राजस्थानातील घुंघटवरही बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यावरुन करणी सेनेने ही धमकी दिली. श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटानंतर तिकडे बुरखाबंदी करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’तून भारतातही बुरखा बंदीची मागणी करण्यात आली होती. त्याबाबत जावेद अख्तर […]

तीन दिवसात माफी मागा, अन्यथा घरात घुसून मारु, करणी सेनेची जावेद अख्तर यांना धमकी
Follow us on

मुंबई : गीतकार जावेद अख्तर यांना राजस्थानच्या राजपूत करणी सेनेने धमकी दिली आहे. जावेद अख्तर यांनी केवळ बुरखाच नव्हे तर राजस्थानातील घुंघटवरही बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यावरुन करणी सेनेने ही धमकी दिली. श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटानंतर तिकडे बुरखाबंदी करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’तून भारतातही बुरखा बंदीची मागणी करण्यात आली होती. त्याबाबत जावेद अख्तर यांनी केवळ बुरखाच नव्हे तर घुंघटवरीही बंदी घाला असं म्हटलं होतं.

जावेद अख्तर यांच्या या वक्तव्यानंतर करणी सेनेने त्यांना धमकी दिली. करणी सेनेचे महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष जीवन सिंह सोळंकी यांनी पत्र प्रसिद्ध केलं आहे. बुरखा हा दहशतवादाशी जोडला आहे. मात्र घुंघटचा त्याच्याशी संबंध नाही. त्यामुळे जावेद अख्तर यांनी तीन दिवसांत माफी मागावी, अन्यथा परिणामांना सामोरं जावं, अशी धमकी सोळंकी यांनी दिली आहे. जर तुम्ही माफी मागितली नाही, तर तुमच्या घरात घुसून मारु, असंही या पत्रात म्हटलं आहे. या पत्रासोबत व्हिडीओ रेकॉर्डिंगही पाठवण्यात आलं आहे.

जावेद अख्तर यांनी या धमकीनंतर ट्विट करुन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. “काही लोक माझ्या वक्तव्याचा अर्थ चुकीचा लावत आहेत. मी म्हटलं होतं की सुरक्षेच्या दृष्टीने श्रीलंकेत बुरखाबंदी केली असावी, मात्र वास्तविक पाहता, हे महिला सक्षमीकरणासाठी आवश्यक आहे. चेहरा झाकणे बंद करायला हवं. मग तो बुरखा असो किंवा घुंघट”, असं जावेद अख्तर यांनी म्हटलं.

दरम्यान, करणी सेनेने यापूर्वी संजय लीला भन्सालींच्या पद्मावत सिनेमादरम्यान हिंसक आंदोलन केलं होतं. शिवाय कंगना राणावतच्या मणिकर्णिका सिनेमा प्रदर्शनापूर्वीही निर्मात्याला धमकी दिली होती.

श्रीलंकेत बुरखाबंदी

श्रीलंकेत 21 एप्रिलला रविवारी ईस्टरच्या दिवशीच झालेल्या साखळी स्फोटात आतापर्यंत 350 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर जवळपास 500 जण जखमी आहेत.  या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंकन सरकारने बुरखा, फेस मास्कसारख्या वस्त्रांना बंदी घातली आहे. चेहरा झाकणार्‍या व्यक्ती राष्ट्रीय आणि सामाजिक सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा नकाब परिधान करणे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य ठरेल, असे श्रीलंकेने जाहीर केलं आहे.

शिवसेनेची मागणी

यावरुन शिवसेनेने मोदी सरकारला प्रश्न विचारला आहे. जे धाडस श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल यांनी दाखवलं, ते धैर्य तुम्ही कधी दाखवणार? रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार? पंतप्रधान मोदी आज अयोध्येला निघाले आहेत, म्हणूनच हा प्रश्न आहे, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

संबंधित बातम्या 

रावणाच्या लंकेत बुरखाबंदी, रामाच्या देशात कधी? शिवसेनेचा सवाल   

‘सरकारने बुरखा आणि घुंघट दोन्हींवरही बंदी घालावी’