पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहर तसेच जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रातील पाणीपातळीत वाढ होत आहे. दरम्यान पुण्यातील खडकवासला धरणातील पाणी साठ्यात चांगलीच वाढ झाली असून, खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे.
टेमघर, खडकवासला, पानशेत आणि वरसगाव या चार प्रमुख धरणांमधून पुण्याला पाणीपुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून राज्यात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुण्याच्या धरण क्षेत्रात पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. पुण्याच्या चारही धरण क्षेत्रात सरासरी 66.59 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
सततच्या पावसामुळे खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे तब्बल 5 हजार 136 पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसेच खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने मुठा नदीला पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. त्याशिवाय पुण्यातील भिडे पुलाला लागून पाण्याचा प्रवाह होत आहे. सतत पाण्याचा विसर्ग सुरु राहिल्यास भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार प्रमुख धरणांमधील खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे. तर पानशेत धरण 74.49 टक्के, वरसगाव 58. 88 टक्के आणि टेमघर 52.3 टक्के भरले आहे.