बीड : पुत्रप्राप्तीसंदर्भात ‘ऑड-इव्हन’चं विधान केल्यानंतर आता प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचं कीर्तन रद्द केल्याचा प्रकार समोर आलाय. अहमदनगरच्या पीसीपीएनडीटी सल्लागार समितीनं इंदुरीकर महाराजांना नोटीस बजावल्यानंतर बीड जिल्ह्यातील नाळलवंडी ग्रामस्थांनी त्यांचं कीर्तनच रद्द केलं (Program of Nivrutti Maharaj Indurikar canceled). त्यामुळे इंदुरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या याच वादग्रस्त विधानामुळे सध्या ते अडचणीत आल्याचं चित्रं आहे. ओझर येथे पुत्रप्राप्तीसंदर्भातील त्यांचं ‘ऑड इव्हन’चं वक्तव्य केल्यानंतर इंदुरीकर महाराजांना सर्वात आधी अहमदनगरच्या पीसीपीएनडीटी कायद्याच्या सल्लागार समितीनं नोटीस बजावून खुलासा मागितला. त्यानंतर आता इंदुरीकर महाराजांना नोटीस बजावली आहे. हे कमी म्हणून की काय आता इंदुरीकर महाराजांच्या पूर्वनियोजित कीर्तनाच्या कार्यक्रमांवरही या वादाचे परिणाम होताना दिसत आहेत.
बीड जिल्ह्यातील नाळलवंडी गावकऱ्यांनी गावातील सोमेश्वर यात्रेनिमित्त मार्चमध्ये इंदुरीकर महाराजांचं कीर्तन ठेवलं होतं. आता त्यांच्या वक्तव्याच्या वादामुळं ग्रामस्थांनी इंदुरीकरांचा हे कीर्तन रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. नाळवंडीत इंदुरीकर महाराजांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहनही करुन त्यांच्याविरोधत जोरदार घोषणाबाजी झाली. नाळवंडीकरांनी इंदुरीकरांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा जाहीर निषेधही केला.
दुसरीकडे भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनीही इंदुरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. इंदुरीकर महाराज कीर्तनात महिलांचा वारंवार अपमान करतात आणि स्त्री-पुरुष समानतेच्या विरोधी वक्तव्य करतात, असा आरोप देसाईंनी केलाय.
कीर्तनातून सामाजिक, राजकीय क्षेत्रातील ज्वलंत विषयांवर भाष्य करुन अनेकांची मनं जिंकणारे कीर्तनकार म्हणून इंदुरीकर महाराजांना ओळखलं जातं. अनोख्या रोखठोक शैलीमुळे इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाला मोठी गर्दी होत असते. पण, इंदुरीकर महाराजांनी थेट पुत्रप्राप्तीसंदर्भात वक्तव्य केल्यानं, वादाला तोंड फुटलंय. त्याचा परीणाम आता थेट त्यांच्या कीर्तनांवर होऊ लागलाय. या वादात आता पुढे काय काय घडतं? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
संबंधित बातम्या :
आखाडा : सम-विषम तारखेवर लिंग कसं ठरतं? लोकांना हसवणारे इंदुरीकर महाराज अडचणीत
इंदुरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता
इंदुरीकर महाराजांचा वाढदिवस सोहळा, सेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसचे नेते एकाच रथात
निवडणूक लढवण्याच्या चर्चेवर इंदुरीकर महाराजांची कीर्तनातून टोलेबाजी
संबंधित व्हिडीओ: