(Sangli Kolhapur Flood) कोल्हापूर : महापुराने वेढलेल्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील (Sangli Kolhapur Flood) पाणी आता ओसरू लागलं आहे. पंचगंगेची पाणी पातळी आता 50 फुटांवर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील 41 गावात अद्यापही जवळपास 15 हजार लोकं अडकलेली आहेत. याशिवाय राष्ट्रीय महामार्गावर (Pune bengaluru highway) तब्बल 30 हजारपेक्षा जास्त वाहनं अडकलेली आहेत.
ठप्प असलेल्या पुणे-बंगळुरु महामार्गावर बंगळुरुच्या दिशेने सकाळी नऊच्या सुमारास एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली. शिरोली फाट्यानजीक महापुराचे पाणी ओसरल्याने अवजड वाहतूक सुरू करण्यात आली. त्यामुळे हजारो ट्रक बंगळुरुकडे रवाना झाले आहेत. त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास पुण्याकडे जाणारी वाहतूकही सुरु करण्यात आली. एकाच मार्गावरुन दोन्ही दिशेकडे जाणारी वाहतूक सुरु करण्यात आली. केवळ दुचाकींना महामार्गावर मनाई आहे.
LIVE UPDATE
▪पुणे-बंगळुर महामार्गावर शिरोली सांगली फाटा इथे महामार्गावरील अवजड वाहतूक सोमवारी (12 ऑगस्ट) सकाळी नऊ वाजता सुरू करण्यात आली आहे.
▪महामार्गावर अजूनही दीड फूट पाणी आहे. त्यामुळे लहान प्रवासी गाड्या सुरू करण्यात आल्या नव्हत्या मात्र आता दुपारी बारा वाजता सर्व प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे.
▪एकाच मार्गावरून कोल्हापूर आणि पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरू झाली आहे. फक्त दुचाकी वाहतूक बंद आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, आमदार अमल महाडिक, शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक किरण भोसले आदींनी महामार्गाची पाहणी केली.
पुरामुळे महामार्ग आठवड्यापासून ठप्प आहे. त्यामुळे सातारा ते कर्नाटकातील तवंदी घाट या दरम्यान किमान 35 हजार वाहने सात दिवसापासून अडकून पडली आहेत. पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग आठवड्यापासून बंद आहे. रविवारी रात्री थोडं पाणी कमी झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेला प्राधान्य देत काही टँकर सोडण्यात आले. दिवसभरात या महामार्गावरुन पाणी, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर आणि औषधे या अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या गाड्या सोडण्यात आल्या. मात्र सर्व वाहनांची वाहतूक अद्याप रोखली होती.
41 गावात 15 हजार लोक अडकून
दुसरीकडे पुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील 41 गावात अद्यापही जवळपास 15 हजार लोक अडकलेली आहेत. याशिवाय राष्ट्रीय महामार्गावर तब्बल 30 हजार वाहनं अडकलेली आहेत. शहरातील पाणी पुरवठा गुरुवारपर्यंत सुरळीत होण्याची शक्यता आहे. अजूनही जिल्ह्यातील 104 बंधारे पाण्याखाली आहेत. दोन्ही जिल्ह्यात आठवड्यापासून बचावकार्य सुरु आहे.
गेल्या आठवडाभरापासून कोल्हापुरात (Sangli Kolhapur Flood) पूरस्थिती आहे. नद्यांना आलेल्या महापुराचं पाणी राष्ट्रीय महामार्गावर आल्याने कोल्हापुरात अनेक रस्ते, महामार्ग हे पाण्याखाली गेले आणि वाहतुकीचा खोळंबा झाला. पुणे-बंगळुरु महामार्गावर पुण्याच्या दिशेने सांगली फाट्याजवळ पंचगंगेचं पाणी रस्त्यावर आलं, त्यामुळे गेल्या 5 ऑगस्टला जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करुन या मार्गावरील वाहतूक थांबवण्याचे आदेश दिले. त्यानंतर पुणे-बंगळुरु हा महामार्ग अद्यापही इतर वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील महापुरात मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या 40 वर पोहचली आहे. याबाबत पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी रविवारी (11 ऑगस्ट) पत्रकार परिषद घेऊन अधिकृत माहिती दिली. यावेळी त्यांनी पूरस्थिती आणि मदत कार्याचीही माहिती दिली. पुराच्या पाणी पातळीत हळूहळू घट होत असल्याचे त्यांनी सांगितले.
स्थलांतरित नागरिकांची आकडेवारी
पूरग्रस्त भागातून एकूण 4 लाख 41 हजार 845 नागरिकांचे स्थलांतरण करण्यात आले आहे. यात सांगलीतील 1 लाख 58 हजार 970, कोल्हापूरमधील 2 लाख 45 हजार 229, सातारामधील 10 हजार 486, सोलापूरमधील 26 हजार 999 नागरिकांचा समावेश आहे.
पूरग्रस्त भागात 3020 वैद्यकीय पथकं पाठवण्यात आली आहेत. पुणे विभागात 30 उपकेंद्रांचा वीज पुरवठा खंडित आहे. त्यामुळे 3 लाख 29 हजार 603 नागरिक प्रभावित आहेत. 1 लाख ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
पुणे विभागात एकूण 163 रस्ते आणि 79 पूल बंद आहेत. आज बँकांची महत्त्वाची बैठक घेण्यात आली आहे. यात पूरग्रस्तांना 15 हजार आणि 10 हजार आर्थिक मदतीपैकी 5 हजार रुपये रोख दिले जाणार आहेत, तर उर्वरित रक्कम पीडितांच्या बँक खात्यावर जमा होईल, असे सांगण्यात आले. त्याचबरोबर बँकांना ATM सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून चेक आणि पासबूक मागितले जाणार नाही, बायोमेट्रीक मशीनवर युआयडी (UID) किंवा ओळख पटवून पैसे दिले जातील, बीएसएनएल सेवा सायंकाळी सुरळीत करण्याची सूचना देण्यात आली आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली.