कोल्हापूर : महानगरपालिकेत येत्या 19 तारखेला होणाऱ्या विशेष सभेत नव्या महापौरांची निवड होणार आहे (Kolhapur Mayor). निवडून येणारे महापौर हे शहराचे 49 वे महापौर असतील. विशेष म्हणजे महानगरपालिका स्थापन होऊन 41 वर्ष झाले असताना महापौर मात्र 48 झाले आहेत. नगरसेवकांना सांभाळण्यासाठी नेत्यांनी महापौरपदाची अक्षरशः खांडोळी केली आहे. दर तीन महिन्याला नवा महापौर करवीरवासीयांना पाहायला मिळतो आहे (Kolhapur Mayor Elections). महापौरपदाची खांडोळी करण्यास सुरुवात झाली ती 2000 पासून. आघाड्यांचे संपून पक्षीय राजकारण कोल्हापूर महापालिकेत सुरू झालं, तरी पदांची खांडोळी मात्र कायम राहिली (Kolhapur Municipal Corporation).
1978 मध्ये कोल्हापूर महापालिकेची स्थापना झाली. त्यावेळी नारायण धोंडीराम जाधव हे कोल्हापूरचे पहिले महापौर झाले. 1978 ते आतापर्यंत कोल्हापुरात 48 महापौरांनी कार्य़भार सांभाळला. गेल्या 10 वर्षात करवीरवासियांनी 14 महापौर पाहिले. 2018 पासून आतापर्यंत तब्बल 4 महापौर बदलण्यात आले आहेत. महापौरपदाबरोबरच आता स्थायी समिती सभापती पदाच्या खांडोळीचाही प्रघात गेल्या वर्षीपासून सुरु झाला आहे.
नगरसेवकांच्या महापौर होण्याच्या अट्टाहासापायी नेत्यांची तर कसरत होतेच, शिवाय शहरातील विकास कामांकडेही दुर्लक्ष होत आहे. कारण, महापौर झाल्यानंतर शुभेच्छा स्वीकारणं आणि काम समजून घेण्यातच त्यांचा वेळ जातो. या सगळ्या प्रकारामुळे महापौरपदाची प्रतिष्ठा तर कमी होतेच शिवाय प्रशासनावरील वचकही कमी होतो आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेत ताराराणी आघाडीच्या माध्यमातून माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व होतं. मात्र, पक्षीय राजकारण आल्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आघडीची मोट बांधत सत्ता संपादन केली. त्याला शिवसेनेची ही साथ मिळाली. पण तरीही महापौर आणि अन्य महत्वाच्या पदाचे तुकडे पडत असल्यानं सामान्य कोल्हापूरकरांमध्ये नाराजी आहे. एकच सक्षम व्यक्ती या पदावर बसवा, अशी माफक अपेक्षा त्यांची आहे.