Kolhapur Rain कोल्हापूर : राज्यभरात गेल्या चार दिवसांपासून पावसाने पुन्हा मुसंडी मारली आहे. गेल्या दोन दिवसांपासून तर धो धो पाऊस कोसळत आहे. पुरात बुडालेलं कोल्हापूर (Kolhapur Rain ) हळूहळू स्थिरस्थावर होत असताना, पुन्हा पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. शहरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 24 तासात तब्बल 3 फुटांची वाढ झाली आहे.
पंचगंगा नदीचे पाणी 22 फुटांवरुन वाहत आहे. जिल्ह्यातील 12 हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. शहर आणि परिसरात पावसाची उघडझाप आहे. मात्र धरणक्षेत्रात संततधार सुरूच आहे.
पंचगंगेची धोक्याची पातळी 43 फुटांवर आहे. मात्र गेल्या महिन्यात आलेल्या महापुराने पाणीपातळी 55 फुटांपेक्षा अधिक पातळीवरुन वाहात होती.
गेल्या 24 तासांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. विशेषतः कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेला असणार्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.
राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढल्याने धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला आहे. धरणांतून प्रतिसेकंद 2828 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, पुन्हा भोगावती नदीची पाणी पातळी वाढायला सुरुवात झाली आहे.
त्यामुळे भोगावती आणि पंचगंगा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील चोवीस तास पावसाचा जोर कायम राहील असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
#कोल्हापूर – धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस, पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत 3 फुटांची वाढ, पंचगंगा नदीचे पाणी 22 फुटांवर, जिल्ह्यातील 12 पेक्षा अधिक बंधारे पाण्याखाली, शहर आणि परिसरात उघडझाप मात्र धरणक्षेत्रात संततधार सुरूच,
राधानगरी धरणाचा दरवाजा पहाटे उघडला #Rain pic.twitter.com/Jecivk4vCD— TV9 Marathi (@TV9Marathi) September 4, 2019
कोल्हापूर-सांगली महापूर
गेल्या महिन्यात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला होता. दोन्ही जिल्ह्यातील अनेक तालुके जवळपास दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस पाण्याखाली होती. दोन्ही जिल्ह्यातील लाखो नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं. शेकडो माणसं आणि हजारो जनावरांचा मृत्यू झाला. महापुरामुळे पुणे-बंगळुरु महामार्ग बंद झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचाही तुटवडा जाणवत होता.