कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये एका भाजी विक्रेत्याने लॉटरीमध्ये एक कोटी रुपये जिंकले आहेत (Lottery). कोलकात्याच्या दमदम परिसरात एक छोटसं भाजीचं दुकान चालवणाऱ्या या व्यक्तीने नवीन वर्षाच्या निमित्ताने नागालँड लॉटरीचं तिकीटं खरेदी केली होती. लॉटरीच्या बक्षिसांची घोषणा झाल्यानंतर काही लोकांनी त्याला सांगितलं की त्याला लॉटरी लागलेली नाही. त्यामुळे रागाच्या भरात त्याने ती तिकीटं कचऱ्यात टाकून दिली (Lottery Ticket). त्यानंतर याच तिकिटांपैकी एका तिकिटावर त्याला एक कोटी रुपयांचं बक्षिस मिळाल्याचं कळलं (Vegetable Seller Won Rs 1 Crore Lottery).
भाजी विक्रेता सादिक हा कोलकात्याच्या दमदम परिसरात भाजीचं दुकान चालवतो. नवीन वर्षाच्या निमित्ताने थर्टी फर्स्टला पत्नीसोबत पाच लॉटरीच्या तिकिटांची खरेदी केली. 2 जानेवारीला या तिकिटांच्या बक्षिसांची घोषणा होणार होती. घोषणा झाल्यानंतर सादिकसोबतच्या काही दुकानदारांनी त्याला सांगितलं की त्याला लॉटरी लागली नाही. हे ऐकून निराश झालेल्या सादिकने लॉटरीचे तिकीट कचऱ्यात टाकले. यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा तो काहीा सामान आणण्यासाठी बाजारात गेला तेव्हा त्याला लॉटरी विकणाऱ्या दुकानदाराने त्याच्या तिकीटबद्दल विचारले आणि त्याला 1 कोटीची लॉटरी लागल्याची माहिती दिली.
दुकानदाराने ही बातमी दिल्यानंतर सादिक लगेच घरी पोहोचला आणि त्याने पत्नी अमिनाला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर दोघांनीही कचऱ्याच्या डब्यात त्या तिकिटांची शोधाशोध केली. अखेर सादिकला ती तिकिटं मिळाली. तिकिटं मिळताच सादिकचं संपूर्ण कुटुंब आनंदी झालं. विषेश म्हणजे सादिकला पाच पैकी पाचही तिकिटांवर बक्षिस मिळालं. त्याला एका तिकिटावर 1 कोटी तर इतर चार तिकिटांवर 1-1 लाख रुपयांचं बक्षिस मिळालं.
लॉटरीच्या या पैशांनी आमचं जीवन बदलू शकतं, अशी भावना सादिकची पत्नी अमिनाने व्यक्त केली. लॉटरीच्या पैशातून सादिकने त्याच्या मुलांसाठी एसयुव्ही बुक केली आहे. त्याशिवाय तो त्याच्या मुलांना अधिक चांगल्या शाळेत पाठवणार आहे, अशी माहिती अमिनाने दिली. सादिकचं कुटुंब खूप आनंदी आहे आणि आता ते या पैशांची वाट पाहत आहेत. लॉटरीच्या तिकिटांची ही रक्कम सादिकला येत्या 2-3 महिन्यात मिळण्याची शक्यता आहे.
Kolkala Vegetable Seller Won Rs 1 Crore Lottery