सिंधुदुर्ग : पश्चिम महाराष्ट्राबरोबरच कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही 15 दिवसांपूर्वी आलेल्या पुराचा फटका (Konkan rice crop) बसला. या पुराचा सर्वाधिक फटका बसला तो कोकणातल्या भात शेतीला. पुराच्या पाण्याने अनेक ठिकाणची भात शेती (Konkan rice crop) वाहून गेलीय, तर अनेक ठिकाणची शेती अक्षरशः कुजून गेलीय. पुराच्या पाण्यात सतत सहा ते सात दिवस भात शेती राहिल्याने ती कुजून गेली. शेतकरी यामुळे हतबल झाले आहेत.
तळकोकणात मुख्य पीक हे भातशेती आहे. जिल्ह्यात आलेल्या पुराचा फटका कृषी क्षेत्राला बसला. जिल्ह्यातील 9985 हेक्टर भातशेती पुरामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. यात 28 हजार 760 शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. जिल्ह्यातील एकूण 76000 एवढं क्षेत्र भात लागवडीखाली आहे. मात्र त्यातील 9985 हेक्टर क्षेत्रातील शेतीचं नुकसान झाल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत.
कुडाळ तालुक्यातील सुरेंद्र राणे हे दरवर्षी दहा एकर शेतात भातशेती करतात. गेल्यावर्षी त्यांनी 65 क्विंटल भात पिकवला होता. त्यापैकी त्यांना वर्षभर कुटुंबाला पुरेल एवढा भात ठेवून बाकीचा भात विकला. यात त्यांनी दीड लाख रुपयांचा नफा मिळाला होता. मात्र यावर्षी पुराच्या पाण्यात त्यांची सहा एकरवरील पूर्ण शेती कुजून गेली आहे. अजूनही त्यांच्या शेती नुकसानीचे प्रशासनाकडून पंचनामे झालेले नाहीत, ना त्यांना कोणतीच मदत मिळाली.
दशरथ राणे या 70 वर्षीय शेतकऱ्याचीही हीच अवस्था आहे. संपूर्ण उपजीविका भात शेतीवर अवलंबून असलेले दशरथ राणे सध्या हवालदिल झाले आहेत. यावर्षी त्यांनी सहा एकर शेती केली होती. त्यांची शेतीही पुराच्या पाण्यात कुजून गेली. गेल्यावर्षी त्यांना 20 क्विंटल भात पीक मिळाल होतं आणि भात विकून त्यांना 30 ते 40 हजाराचा नफा झाला होता. मात्र भातशेतीवर अवलंबून असलेले दशरथ राणे हताश झाले आहेत.
भात शेतीचं नुकसान होऊन 15 दिवस उलटल्यानंतरही अजून पंचनामे झालेले नाहीत. एकीकडे सरकारी उदासिनता, तर दुसरीकडे नैसर्गिक संकट अशा परिस्थितीत कोकणातील शेतकरी सापडले आहेत. प्रशासनाने तातडीने पंचनामे करुन मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.