तिहार जेलमधील बॉयफ्रेण्डला भेटण्यासाठी विवाहितेचा नसता उपद्व्याप

| Updated on: Aug 13, 2019 | 1:36 PM

दिल्लीतील तिहार जेलमध्ये कैद असलेल्या प्रियकराला भेटण्यासाठी एक महिला एनजीओ कर्मचारी असल्याचं सांगून आत शिरली. तिने चार दिवसात पाच तास त्याच्यासोबत घालवले

तिहार जेलमधील बॉयफ्रेण्डला भेटण्यासाठी विवाहितेचा नसता उपद्व्याप
Follow us on

नवी दिल्ली : जेलमध्ये शिक्षा भोगणाऱ्या प्रियकराला भेटण्यासाठी एका विवाहित महिलेने भलतीच ‘आयडियाची कल्पना’ लढवली. आपण एनजीओ कर्मचारी असल्याचं सांगत महिलेने चार दिवस तुरुंगात प्रवेश मिळवला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा तुरुंग देशातील सर्वात सुरक्षित मानला जाणारा राजधानी दिल्लीतील तिहार जेल (Tihar jail) आहे.

हेमंत नावाचा कैदी तिहार जेलमधील बॅरक नंबर दोनमध्ये कैद आहे. हत्या प्रकरणामध्ये हेमंतला गजाआड करण्यात आलं आहे. मात्र त्याची भेट घेण्यासाठी त्याची प्रेयसी कडेकोट सुरक्षा भेदत तिहार तुरुंगात पोहचली. तिने आपण एनजीओची कार्यकर्ती असल्याचं सांगत प्रवेश मिळवला.

एकच नाही, तर चार दिवस ती बॉयफ्रेण्डच्या भेटीसाठी तुरुंगात येत होती. तिने प्रियकरासोबत तब्बल पाच तास घालवले. खरं तर शनिवारच्या दिवशी साधारणपणे कैद्याला कोणाचीही भेट घेऊ दिली जात नाही. मात्र संबंधित महिलेला त्याही दिवशी परवानगी मिळाली होती.

चौथ्या दिवशी एका अधिकाऱ्याने तिला रोखलं. त्यावर महिलेकडे प्रवेश करण्याची परवानगी असल्याचं तुरुंगातील इतर कर्मचाऱ्यांनी सांगितलं. इतकंच नाही, तर ती याआधीही तुरुंगात येऊन गेल्याचंही सांगितलं. त्यानंतर अधिकाऱ्यांनी जेल मुख्यालयाच्या कानावर हे प्रकरण घातलं. तिहार जेल प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

तुरुंग अधीक्षकांनी महिलेला जारी केलेल्या पासवर ती स्वयंसेवी संस्थेशी निगडीत असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे जेल प्रशासनाच्या रजिस्टरमध्येही तिची नोंद नाही. तिहारसारख्या तुरुंगात इतकी हलगर्जी होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

पॅरोलवर असताना मॅट्रिमोनियल साईटवर भेट

कैदी हेमंत आणि महिलेची ओळख एका मॅट्रिमोनियल साईटवर झाली होती. प्रोफाईलवर त्याने आपण तिहार जेलचा कर्मचारी असल्याचं सांगितलं होतं. हेमंत 26 दिवसांसाठी पॅरोलवर असताना दोघांची भेट झाली. त्या काळात दोघांचं नातं घट्ट झालं.

संबंधित महिलेला हेमंतसोबत विवाह करण्याची इच्छा आहे. हेमंतही लग्नासाठी तयार आहे. महिलेला पहिल्या पतीपासून एक मुलगा आहे.

ज्या बॅरक नंबर दोनमध्ये हेमंतला ठेवण्यात आलं आहे, तिथे छोटा राजन, शहाबुद्दीन, गँगस्टर नीरज बवानिया, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यासारखे कैदी आहेत. अशा ठिकाणी महिलेचा सहज वावर असल्याने सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे.

या प्रकरणी तिहार जेलचे अतिरिक्त महानिरीक्षक राजकुमार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी अधिक तपास केला जात असून दोषींवर कारवाई केली जाणार आहे.