नाशिक : नाशिकमधील लासलगाव जळीतकांड प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट आला आहे. तरुणाने महिलेवर पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याचा आरोप सुरुवातीला झाला होता, मात्र दोघांच्या झटापटीत आपल्या अंगावर पेट्रोल सांडल्याने मी पेटले, त्याचा मला जाळण्याचा उद्देश नव्हता, असा दावा (Lasalgaon Lady Burn Case) खुद्द पीडितेनेच केला आहे. विशेष म्हणजे आरोपी तरुणाशी महिलेचा पुनर्विवाह झाल्याचीही माहिती आहे.
पीडितेची जबानी काय?
“आम्हा दोघांचं भांडण सुरु होतं. मी त्याला म्हटलं, की जर तुला माझ्यामुळे त्रास होत असेल तर मी घरी निघून जाते. माझ्या गाडीतील पेट्रोल संपलं होतं. मी गाडीत पेट्रोल भरत होते. तेवढ्यात तो आला आणि ओढाओढीत पेट्रोल सांडलं. तो म्हणाला तू काय करतेस, थांब मीच करतो. तेवढ्यात माझ्या अंगावर थोडं पेट्रोल सांडलं, थोडं त्याच्या अंगावरही सांडलं. त्याने काडी स्वतःच्या अंगाकडे पेटवून घेतली, झटापटीत माझ्याकडे काडी आली आणि मी पेटले, तो नाही पेटला, तो पळाला. ही माझं नाव सांगेल की काय, म्हणून तो घाबरला. त्याचा मला जाळायचा उद्देश नव्हता, फक्त तो घाबरला. सकाळपासून आमचं भांडण सुरु होतं. मी आधीच हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते, त्यामुळे त्याला वाटलं हे माझ्यावरच येईल.” असा जबाब पीडितेने दिला आहे.
आरोपीने पीडित महिलेशी 22 जानेवारीला लग्न केलं होतं, मात्र ते तिच्या घरच्यांना मान्य नसल्याची माहिती आहे.
नेमकं प्रकरण काय?
नाशिक जिल्ह्यातील वर्दळीच्या लासलगाव बस स्टॅण्डवर शनिवारी (15 फेब्रुवारी) सकाळी महिृला पेटल्याची घटना समोर आली होती. तरुणाने महिलेवर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला होता. मात्र पीडितेच्या जबानीनंतर या प्रकरणात नवा ट्विस्ट आला.
70 टक्के भाजलेल्या पीडित महिलेला महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. तिथे तिच्यावर प्राथमिक उपचार करुन तिला पुढील उपचारांसाठी नाशिक येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. या प्रकरणाची माहिती मिळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालय गाठत पीडितेची विचारपूस केली होती. सध्या तिला मुंबईतील भायखळ्याच्या मसिना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, मात्र तिची प्रकृती गंभीर (Lasalgaon Lady Burn Case) आहे.