रायगड : दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांच्या पहिल्या पत्नी गीतांजली खन्ना यांचं निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. रायगड जिल्ह्यातील मांडवाजवळ कोळगावातील त्यांच्या फार्म हाऊसवर गीतांजली यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं निधन नेमकं कशामुळे झालं याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण गेल्या काही दिवसांपासून गीतांजली यांना श्वसनाचा त्रास होत असल्याचं बोललं जातंय.
डॉक्टरकडून तपासणी झाल्यावर आणि औषधं घेतल्यानतंर गीतांजली त्यांच्या खोलीत जाऊन झोपल्या. पण रात्री 9 ते 10 च्या दरम्यान झोपेतच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अलिबागमधील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. पण रुग्णालयात पोहोचताच त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
गीतांजली यांच्यावर रविवारी दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी दोन्ही मुलं अक्षय खन्ना आणि राहुल खन्ना उपस्थित होते. गीतांजली त्यांचा मोठा मुलगा अभिनेता अक्षय खन्नासोबत वीकेंडसाठी मांडवापासून 15 किमी दूर असलेल्या फार्महाऊसवर गेल्या होत्या.
विनोद खन्ना आणि गीतांजली यांचा विवाह 1971 साली झाला होता. 14 वर्षांच्या संसारानंतर दोघांचा घटस्फोट झाला. विनोद खन्ना अचानकपणे अमेरिकेत जाऊन ओशोला शरण गेल्यामुळे कौटुंबीक वाद झाल्याचं बोललं जातं. विनोद खन्ना यांचं निधन 27 एप्रिल 2017 रोजी झालं होतं.