लातूर शहर विधान सभा मतदार संघातून यंदा स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे ज्येष्ठ पूत्र अमित देशमुख चौथ्यांदा निवडणूक लढवित आहेत. यापूर्वी अमित देशमुख यांनी तीन वेळा विधान सभा निवडणूक जिंकलेली आहे. यावेळी मात्र भाजपाकडून प्रथमच तगडं आव्हान त्यांना देण्यात आलेले आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची सून डॉ.अर्चना पाटील यांना भाजपाने तिकीट दिलेले आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर डॉ.अर्चना पाटील यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीने विनोद खटके यांना उमेदवारी दिलेली आहे.त्यामुळे कागदावर तरी ही निवडणूक तिरंगी असली तरी मुख्य लढत देशमुख आणि चाकूरकर घराण्यात होणार असल्याने दोन्ही घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
अमित देशमुख यांच्या आधी त्यांचे वडील आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख या मतदार संघाचे साल 1980 पासून प्रतिनिधीत्व करीत आलेले आहेत. या ठिकाणी विलासरावांचा वारसा त्यांचे ज्येष्ठ पूत्र अमित देशमुख यांनी साल 2009 पासून चालविण्यास सुरुवात केली आहे. सलग तीन वेळा अमित देशमुख येथून निवडून आलेले आहेत. भाजपाकडून त्यांना फारसे तोडीचे उमेदवार दिले जात नाहीत अशी येथील मतदारांची धारणा होती. त्यामुळे अमित देशमुख यांचा विजय एकहाती होत असे. त्यांना भाजपाकडून फारसे तगडे आव्हान दिले जात नव्हते. यंदा माजी कॉंग्रेसचे नेते माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सूनेला ( डॉ.अर्चना पाटील ) अमित देशमुख यांच्या विरोधात उभे केले आहे.
डॉ.अर्चना पाटील सुशिक्षित असून आपल्या रुग्णालयाच्या माध्यमातून त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. साल 2019 पासून अर्चना पाटील निवडणूकीची तयारी करीत आहेत. परंतू कौटुंबिक कारणांनी त्यांनी तेव्हा निवडणूक लढविली नव्हती. दुसरीकडे त्यांचे सासरे शिवराज पाटील चाकूरकर यांनी आपली सून भाजपात गेली असली तरी आपण भाजपात प्रवेश केलेला नाही असे म्हटले आहे. शिवराज पाटील गेली अनेक वर्षे सक्रीय नसल्याने त्यांचे कार्यकर्तेही अमित देशमुख यांच्याकडे वळले असल्याचे म्हटले जात आहे. अशाच अर्चना पाटील यांची भिस्त सासऱ्यांच्या पुण्याईवर अवलंबून आहे. तर अमित देशमुख यांच्या पाठीशी वडीलांची पूण्याई आहे. त्यामुळे कोणाचा विजय होतो. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणूकीच्या वेळी कॉंग्रेसला दलित आणि मुस्लीम मते मिळालेली होती. परंतू यंदा लातूर शहर विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेसची मते खाण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विनोद खटके यांचा काय फायदा होतो, यावर कॉंग्रेसचे विद्यमान आमदार अमित देशमुख यांचे भवितव्य अवलंबून आहे. डॉ. अर्चना पाटील – चाकूरकर या लिंगायत समाजाच्या असल्याने त्यांना लिंगायत समाजाचा पाठींबा मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. परंतू अमित देशमुख यांना लिंगायत समाजाची मते मिळण्याची शक्यता अधिक आहे. येथील विलासराव देशमुख यांची पुण्याई अमित देशमुख कामी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लिंगायत आणि मराठा अशा मतांच्या पाठींब्यावर त्यांचा विजय सोपा असल्याचे म्हटले जात आहे.
लातूर शहर विधानसभा निवडणूक निकाल
(2019)
उमेदवाराचे नाव | पक्ष | एकूण मते | व्होट शेअर |
---|---|---|---|
अमित देशमुख | कॉंग्रेस | 1,11,156 | 52.48 टक्के |
शैलेश लाहोट | भाजप | 70,741 | 33.40 टक्के |
राजासाब मणियार | वंचित बहुजन आघाडी | 24,604 | 11.62 टक्के |
लातूर जिल्ह्यात लोकसभेचा एक मतदार संघ असून त्यात विधानसभेचे सहा मतदार संघ मोडतात. लातूर लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश होतो. त्यात लातूर ग्रामीण, लातूर शहर, अहमदपूर, उदगीर, निलंगा, औसा अशा सहा मतदार संघाचा समावेश होतो. लातूर जिल्हा हा दुष्काळग्रस्त जिल्हा असून या जिल्ह्याचे नेतृत्व माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केलेले आहे.
लोकसभेत लातूर येथून कॉंग्रेसचे शिवाजीराव काळगे यांचा यंदा विजय झाला होता. कॉंग्रेसचे शिवाजीराव काळगे यांना 6 लाख 9 हजार 120 मते मिळाली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांना 5 लाख 47 हजार 140 मते मिळाली होती. 61,881 मतांनी शिवाजीराव काळगे यांचा विजय झाला होता.
लातूरमध्ये पाण्याचा प्रश्न पाचवीला पूजलेला आहे.रस्ते, स्वच्छता , सांडपाण्याचा निचरा, कचऱ्याचे सर्वत्र पसलेले ढीग असे लातूर शहराचे चित्र कायम आहे. शहराची वाढ होत असताना आरोग्याच्या सुविधा आणि वाहतूक कोंडी आदी प्रश्न कायम आहेत. लातूर जिल्हा शासकीय रुग्णालयाला निधी मिळाला नसल्याने अमित देशमुख यांच्या विरोधात नाराजी आहे. येथील मुलभूत प्रश्न कायम असल्याने लातूरच्या निवडणूकीत यंदा भाजपाने माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून डॉ.अर्चना पाटील यांना उतरवून निवडणूकीत रंगत आणली आहे.
लातूर शहर विधानसभा मतदार संघातून यंदा एकूण 23 उमेदवार निवजणूकीच्या रिंगणात आहेत. यात प्रमुख तीन उमेदवारात लढत पाहायला मिळणार आहे. कॉंग्रेसचे विद्यमान आमदार अमित देशमुख यांच्या विरोधात प्रमुख लढत भाजपाच्या उमेदवार डॉ.अर्चना पाटील चाकूरकर यांच्यात होत आहे. तर वंचित बहुजन आघाडीने विनोद खटके यांना उमेदवारी दिलेली आहे.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात यंदा एकूण 18 उमेदवार आपले नशीब आजमविणार आहेत. कॉंग्रेसचे विद्यमान आमदार धीरज देशमुख यांच्यात आणि भाजपाचे रमेश कराड यांच्यात प्रमुख लढत होत होत आहे.
अहमदपूर विधानसभा मतदार संघात तिरंगी निवडणूक होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विनायकराव पाटील तसेच भाजपाचे बंडखोर उमेदवार गणेश हाके यांच्यात ही तिरंगी लढत होणार आहे.
उदगीर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार संजय बनसोडे विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार सुधाकर भालेराव यांच्या मुख्य लढत होत आहे.
निलंगा विधानसभा मतदारसंघात भाजपाचे विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या विरोधात काँग्रेसचे अभय साळुंखे यांच्यात मुख्य लढत होत आहे.
औसा विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे दिनकर माने यांच्या मुख्य लढत होणार आहे.