बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांनी आजवर अनेक हिट सिनेमा दिले आहेत. तेजाब, परिंदा, नायक ते नुकतच रिलीज झालेला ‘अॅनिमल’ सिनेमा असो. त्यांच्या भूमिकेची नेहमीच चर्चा होताना दिसते. अनिल कपूर सध्या ‘बिग बॉस ओटीटी 3’ कार्यक्रमात व्यस्त आहेत. वयाची साठी ओलांडली असली तरी अनिल कपूर फिट अँड फाईन आहेत. ‘बिग बॉस ओटीटी 3 च्या निमित्ताने घेतलेल्या एका मुलाखतीमध्ये अनिल कपूर यांनी मराठीचा सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण सांगितली. यावेळी त्यांनी अनिल कपूर यांनी त्यांचा आवडता मराठी सिनेमा कोणत हे ही सांगितले. सलमान खान याच्याऐवजी अनिल कपूर ‘बिग बॉस ओटीटी ३’ च्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळत आहेत.
मराठी आणि हिंदी चित्रपटात काम करून लक्ष्मीकांत बेर्डें यांनी प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. प्रेक्षकांनीही त्यांच्यावर भरभरून प्रेम केले. याच लक्ष्मीकांतची आठवण सांगताना अनिल कपूर भावूक झाले होते. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत मी बेटा सिनेमात काम केले होते. त्यांच्याबरोबर काम करताना एक वेगळी मजा आली. लक्ष्मीकांत बेर्डेजी खूप मस्त माणूस होते असे अनिल कपूर म्हणाले.
एकदा लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मला फोन केला. ‘हमाल दे धमाल हा मराठी सिनेमा ते करत होते. या सिनेमात मी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारावी अशी त्यांची इच्छा होती. मी त्यांना लगेच होकार कळवला. हमाल दे धमाल सुपरहिट झाला. सिल्व्हर ज्युबिली झाला. माझा पहिलाच मराठी चित्रपट आणि तो ही सिल्व्हर ज्युबिली झाला. हे भाग्य मला लक्ष्मीकांत बेर्डे आणि या सिनेमामुळे मिळाले असे ते म्हणाले.,
हमाल दे धमाल सिनेमा जेव्हा बघितला तेव्हा मला खूप मजा आली. मराठीतला हाच माझा फेव्हरेट सिनेमा आहे. त्यामध्ये मी काम केलं म्हणून तो माझा आवडता सिनेमा आहे असे नाही. तर, लक्ष्मीकांत बेर्डें यांच्यासोबत पहिल्यांदा मराठीमध्ये काम केले म्हणून तो आवडता सिनेमा आहे, असे सांगत अनिल कपूर यांनी लक्ष्याच्या आठवणीना उजाळा दिला.