नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानच्या वायूसेनेत जम्मू काश्मीरमध्ये सीमेवर संघर्ष पाहायला मिळाला. भारताने एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानने बदला घ्यायचा म्हणून भारतीय सीमेत घुसून बॉम्बने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात पाकिस्तानने भारतीय विमान पाडल्याचं बोललं जातंय. शिवाय दोन पायलट आमच्या ताब्यात असल्याचा दावाही पाकिस्तानने केलाय. विशेष म्हणजे आमचा एक पायलट बेपत्ता असल्याची कबुली भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
पाकिस्तानच्या दिल्लीतील उच्चायुक्तांना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून समन्स बजावण्यात आलं होतं. या बैठकीत भारताकडून पाकिस्तानला स्पष्ट शब्दात इशारा देण्यात आलाय. भारतीय विंग कमांडरला आमच्या ताब्यात देण्यात यावं, त्यांच्या केसालाही धक्का लागता कामा नये, असा इशाराही भारताने दिल्याची माहिती आहे. त्यामुळे भारतीय पायलटला सोडवण्यासाठी केंद्र सरकारनेही आता दबाव टाकणं सुरु केलं आहे.
भारतीय विंग कमांडरने विमान कोसळल्यानंतर त्यांनी स्वतःची सुटका तर केली, पण त्यांना पाकिस्तानने ताब्यात घेतलं. त्यांना परत आणा म्हणत सोशल मीडियावर मोहिम सुरु झाली आहे.
युद्धबंदीसाठी काय आहे नियम?
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नियम पाळत असेल तर भारतीय विंग कमांडरच्या केसालाही धक्का लावता येणार नाही. कारण, युद्धबंदींसाठी खास करार आहे. जिनेव्हा करार असं याचं नाव आहे. या करारानुसार युद्धबंदींना भीती दाखवली जाऊ शकत नाही, किंवा त्यांचा अपमानही केला जाऊ शकत नाही. युद्धबंदींचा वापर करुन जनतेमध्ये उत्सुकता करण्यासाठीही बंदी आहे.
जिनेव्हा करारानुसार, एकतर युद्धबंदीवर खटला चालवला जाऊ शकतो, किंवा संबंधित देशाकडे त्या युद्धबंदीचं हस्तांतरण करावं लागेल. युद्धबंदी पकडल्यानंतर नाव, सैन्यातील पद आणि नंबर सांगण्याची तरतूद आहे. त्यामुळे पाकिस्तानी लष्कराला भारतीय पायलटला एका सैनिकासारखीच वागणूक द्यावी लागेल.
दरम्यान, जिनेव्हा कराराचं उल्लंघन अनेक देशांनी केलेलं आहे. मानवी मूल्य जोपासण्याच्या दृष्टीने हा करार करण्यात आला होता.
VIDEO :