मुंबई : कर्नाटकचे भाजप नेते एस. एम. कृष्णा (S M Krishna) यांचे जावई आणि कॅफे कॉफी डेचे (Cafe Coffee Day – CCD) प्रमुख वी. जी. सिद्धार्थ (V G Siddharth) सध्या बेपत्ता आहेत. ते नेत्रावती नदी किनाऱ्यावरून बेपत्ता झाले असून त्यांनी आत्महत्या केल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. मात्र यानिमित्ताने त्यांची सर्वत्र मोठी चर्चा सुरु आहे. सीसीडीच्या देशभरात अनेक शाखा असून त्याची एक वेगळी ओळख आहे. सिद्धार्थ यांनी इंटर्न म्हणजेच शिकाऊ कर्मचारी म्हणून सुरुवात केली. त्यात अत्यंत कमी वेतनावर काम करत त्यांनी सीसीडीचं साम्राज्य उभं केलं. त्यांचा हा प्रवास अनेकांना थक्क करणारा आहे.
कर्नाटकमधील चिक्कमंगळुरु जिल्ह्यात सिद्धार्थ यांचा जन्म झाला. त्यांनी मंगळुरु विद्यापीठातून इकोनॉमिक्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यांचं लग्न भारताचे माजी परराष्ट्र मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांच्या मुलीशी झाले. कृष्णा सध्या भाजपचे नेते आहेत. पदव्युत्तर शिक्षणानंतर सिद्धार्थ यांनी 1983-84 मध्ये मुंबईत जे. एम. फायनान्शिअल लिमिटेडमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी/इंटर्न म्हणून कामाला सुरुवात केली. त्यावेळी ते केवळ 24 वर्षांचे होते. येथे त्यांनी केवळ 2 वर्ष काम केले. त्यानंतर व्ही. जी. सिद्धार्थ बंगळुरुला परत आले. त्यांनी आपल्या वडिलांकडून व्यवसायासाठी पैसे घेतले.
कुटुंबाचा 130 वर्षांपासून कॉफीच्या व्यवसायाशी संबंध
जवळपास 30 हजार रुपयांच्या भांडवलात त्यांनी एका कंपनीचे ‘स्टॉक मार्केट कार्ड’ घेतले. या कंपनीला पुढे त्यांनी एक यशस्वी गुंतवणूक करणारी आणि स्टॉक ब्रोकिंग कंपनी म्हणून लौकिकास आणले. जवळपास 10 वर्ष त्यांनी या कंपनीच्या माध्यमातून शेअर ट्रेडिंग व्यवसाय केला. त्यानंतर त्यांना आपलं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली. त्यांचं कुटुंब जवळपास 130 वर्षांपासून कॉफीच्या व्यवसायाशी संबंधित आहे. त्यामुळे त्यांनी देखील चिकमंगळुरुमध्ये कॉफीचे उत्पादन करुन निर्यात करण्यास सुरुवात केली.
कंपनीचा कॉफी निर्यातीचा सध्याचा व्यवसाय 2500 कोटी रुपये
पुढे सिद्धार्थ यांनी 1993 मध्ये कॉफी ट्रेडिंगसाठी ‘अमलगमेटेड बीन कंपनी’ (ABC) ची स्थापना केली. त्यानंतर ते दरवर्षी 28,000 टन कॉफी निर्यात करु लागले. त्यांच्या या कॉफी निर्यात कंपनीचा सध्याचा व्यवसाय 2500 कोटी रुपयांपर्यंत पोहचला आहे. ही कंपनी ग्रीन कॉफी निर्यात करणारी भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीकडे 12,000 एकरचा कॉफी प्लँटेशनचा प्रकल्प आहे.
तरुणांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या सीसीडीच्या देशभरात 1550 हून अधिक शाखा
कर्नाटकमध्ये 1996 मध्ये सिद्धार्थ यांनी तरुणांच्या हँगआऊटसाठी कॅफे कॉफी डेची (सीसीडी) सुरुवात केली होती. सीसीडीची पहिली शाखा (Outlet) बंगळुरु येथे सुरु झाली. त्यांची ही कल्पना तरुणांमध्ये अल्पावधीत लोकप्रिय झाली. आज संपूर्ण देशात सीसीडीच्या 1550 हून अधिक शाखा आहेत. कॉफी कॅफे डेला दररोज जवळजवळ 50,000 ग्राहक भेट देतात.
सिद्धार्थ यांनी 2000 मध्ये ग्लोबल टेक्नोलॉजी व्हेंचर्स लिमिटेडची (GTV) स्थापना केली. ही कंपनी तंत्रज्ञानातील भारतीय कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत होती. जीटीवीने आतापर्यंत 24 स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांची अन्य एक कंपनी ‘वे2वेल्थ ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड’ लोकांना गुंतवणुकीबाबत सल्ले देते.
गुयानात कंपनीकडे लीजवर 18.5 कोटी हेक्टर जंगल
सिद्धार्थ यांनी Daffco Furniture ही डार्क फॉरेस्ट फर्नीचर कंपनी सुरु केली. या कंपनीचा कर्नाटकमधील चिकमगळुरु येथे 6 लाख वर्ग फुटाचा कारखाना सुरु करण्यात आला आहे. त्यासाठी आवश्यक लाकूड लॅटिन अमेरिकन देश ‘रिपब्लिक ऑफ गुयाना’ येथून मागवण्यात येते. गुयाना येथे कंपनीने लीजवर 18.5 कोटी हेक्टर जंगल घेतले आहे. 2011 मध्ये सिद्धार्थ यांना फोर्ब्स इंडियाने ‘नेक्स्टजन आंत्रप्रेन्योर’ पुरस्कारही दिला.
कॉफी डे एंटरप्रायजेसला मागील काही वर्षात मोठा तोटा
मात्र, सीसीडी चालवण्यासाठी सिद्धार्थ यांच्या कॉफी डे एंटरप्रायजेस लिमिटेडला मागील काही वर्षात मोठा तोटा होत आहे. 2018-19 मध्ये या कंपनीच्या नफ्यात मोठी घट झाली. या वर्षात कंपनीचे उत्पन्न 124.06 कोटी रुपये होते, तर त्याआधी कंपनीचे उत्पन्न 142 कोटी रुपये होते. मात्र, कंपनीचा तोटा आता वाढून 67.71 कोटी रुपयांपर्यंत पोहचला आहे.