नवी दिल्ली : कारगिल युद्धाला 20 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बोलताना वायूसेना प्रमुख बीएस धानोआ यांनी पाकिस्तानला धमकीवजा इशारा दिलाय. पुन्हा कारगिलसारखं युद्ध झाल्यास आपण कधीही तयार आहोत, असं ते म्हणाले. सर्व चांगल्या जनरल्सप्रमाणे आम्ही अखेरचं युद्ध लढण्यास तयार आहोत, असं म्हणत त्यांनी पाकिस्तानला इशारा दिला. शेजारी पाकिस्तानने काही हालचाल केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, हे त्यांनी स्पष्ट केलं.
पाकिस्तानने पाच महिने आपल्या हवाई क्षेत्रात भारतीय विमानांना प्रवेश बंदी केली होती. ही बंदी पाकिस्तानने स्वतःहून मागे घेतल्यानंतर काही तासातच बीएस धानोआ यांचा हा सूचक इशारा आलाय. गरज पडल्यास आपण कोणत्याही वातावरण, मग ढगाळ वातावरण असताना आकाशातूनही आपण बॉम्ब टाकू शकतो. 26 फेब्रुवारीला (बालाकोट एअर स्ट्राईक) आपण असाच एक हल्ला पाहिलाय, जो आपली ताकद लांबूनच मारा करण्याची क्षमता सिद्ध करतो, असं ते म्हणाले.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या 40 जवानांना वीरमरण आलं होतं. यानंतर भारताने बदला घेत पाकिस्तानमध्ये असलेल्या बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक केला. वायूसेनेच्या विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर बॉम्बचा मारा केला होता, ज्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचाही दावा करण्यात आला. सीमेवरील तणाव पाहता पाकिस्तानने 27 फेब्रुवारीपासून हवाई क्षेत्र बंद केलं होतं. बिथरलेल्या पाकिस्तानने काही दिवसांसाठी स्वतःच्याच विमानांचं उड्डाण रोखलं होतं.