पुण्यात चार दिवस मद्यविक्री बंद; पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

| Updated on: Nov 27, 2020 | 11:51 AM

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशांनुसार पुणे शहरात 29, 30 नोव्हेंबर तसेच 1 आणि 3 डिसेंबरला ड्राय डे असणार आहे.

पुण्यात चार दिवस मद्यविक्री बंद; पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Follow us on

पुणे : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीच्या (graduate and teachers constituency elections) पार्श्वभूमीवर पुण्यात येत्या रविवारपासून चार दिवस मद्यविक्री, परमिट रूम आणि बार बंद असणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (collector Dr Rajesh Deshmukh) यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार पुणे शहरात 29, 30 नोव्हेंबर तसेच 1 आणि 3 डिसेंबरला ड्राय डे असणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ड्राय डे बाबत आदेश दिले आहेत. (liquor sale closed for four days in Pune; Collector’s order on graduate and teachers constituency elections)

मतदानाच्या 48 तास अगोदर म्हणजेच 29 नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजल्यानंतर मद्याची दुकाने आणि बार बंद राहतील. तर 1 डिसेंबरला मतदान असून सायंकाळी पाच वाजता मतदान संपल्यानंतर ती उघडतील. त्यानंतर 3 डिसेंबरला मतमोजणी आहे. त्यादिवशी पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधील दुकाने आणि बार बंद राहतील.

दरम्यान, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार प्रचारमोहीम राबवल्या आहेत. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत यांदाच्या पदवीधर निवडणुकीत पाहायला मिळत आहे. पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणेने मोठी खबरदारी घेतलेली पाहायला मिळत आहे. कारण पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेदरम्यान मतदान केंद्रांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. कुठल्याही निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच वैद्यकीय अधिकारी मतदान केंद्रावर असणार आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यात 1 डिसेंबरला राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघासाठी मतदान पार पडणार आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता पुणे जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. महत्वाची बाब म्हणजे मतदानाच्या एक दोन दिवस आधी मतदान पॉझिटिव्ह आला तरीही त्याला मतदान करता येणार आहे. मतदानाच्या दिवशी शेवटच्या एका तासात पॉझिटिव्ह व्यक्तीला मतदान करता येणार आहे. तसंच मतदान केंद्रांवर पीपीई कीट, सॅनिटायझर, औषध-गोळ्यांची सोय केली जाणार आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी ही माहिती दिली आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात मनसेमुळे तिरंगी लढत

कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड (Arun Lad), भाजपचे संग्रामसिंह देशमुख (Sangram singh Deshmukh) आणि मनसेच्या रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) या दोन पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या मतदारसंघात एकूण 62 उमेदवार रिंगणात आहेत. यावेळी मनसेने पदवीधर निवडणुकीत उडी घेतल्यानं मतविभाजनाचा फटका टाळण्याचे आव्हान आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात सुमारे साडेपाच लाख मतदार असून त्यात सर्वाधिक मतदारांची संख्या पुण्यात आहे. त्याखालोखाल सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूरमध्ये मतदार आहेत. मागच्या पदवीधर निवडणुकीत पंधरा टक्के मतदान झाले. यावेळी मतदारांची संख्या वाढल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.

पुणे पदवीधर प्रमुख उमेदवार

अरुण लाड ( राष्ट्रवादी काँग्रेस )
संग्राम देशमुख (भाजप)
रुपाली पाटील ( मनसे )
शरद पाटील ( जनता दल )
सोमनाथ साळुंखे (वंचित बहुजन आघाडी )
श्रीमंत कोकाटे ( इतिहास संशोधक)
डॉ.अमोल पवार ( आम आदमी पक्ष)
अभिजित बिचुकले (अपक्ष)

संबंधित बातम्या:

पुणे पदवीधर स्पेशल रिपोर्ट : दोन ‘पाटील’ प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला, मनसेमुळे तिरंगी लढत

पुणे पदवीधरचे चित्र स्पष्ट, राष्ट्रवादीचे अरुण लाड आणि भाजपचे संग्राम देशमुख यांच्यात मुख्य लढत, 62 उमेदवार रिंगणात

पुणे पदवीधर निवडणुकीतून ‘रयत’ची माघार, तर खोतांचा सन्मान राखण्याची चंद्रकांत पाटलांची ग्वाही

पुणे पदवीधर स्पेशल रिपोर्ट : दोन ‘पाटील’ प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला, मनसेमुळे तिरंगी लढत

(liquor sale closed for four days in Pune; Collector’s order on graduate and teachers constituency elections)