दिल्ली: देशभरातील शेतकरी आज पुन्हा एकदा राजधानी दिल्लीत धडकले आहेत. कृषीक्षेत्रावर ओढवलेले आर्थिक संकट आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे 21 दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवण्यात यावे, अशी मागणी करत अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्रासह देशभरातील लाखो शेतकरी राजधानी दिल्लीत पोहोचले आहेत. तब्बल 200 शेतकरी संघटना एकत्र येत, संपूर्ण देशातून पदयात्रा करुन मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीत आले आहेत. सध्या हे शेतकरी दिल्ली हरियाणा बॉर्डरवर बिजवासन परिसरात थांबले आहेत. येथून 25 किलोमीटरची पदयात्रा करत रामलीला मैदानात पोहोचणार आहेत. ‘किसान मुक्ती मोर्चा’ असे मोर्चाचे नाव असून यासाठी देशभरातील 200 शेतकरी संघटनांचे शेतकरी आज आणि उद्या दिल्लीत दाखल होणार आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते जमा होणार असल्याने, दिल्ली पोलिसांनी मार्गदर्शिका जारी केली आहे. याअंतर्गत जंतर-मंतरवर एक हजारहून अधिक लोक एकत्रित येणे प्रतिबंधित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची संख्या वाढली तर त्यांना जंतर मंतरवरुन रामलीला मैदानात जाऊन धरणे आंदोलन करावे लागेल. या आंदोलनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह 20 पेक्षा अधिक राजकीय पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. तर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण पाठवलं आहे.
LIVE UPDATE
10 AM – रामलीला ते संसद मार्ग वरील किसान कर्ज मुक्ती मार्च ला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली , खा.राजू शेट्टी यांनी दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह
शेतकऱ्यांच्या रेल्वेत पाण्याचा थेंब नाही, अधिकारी म्हणतो, रेल्वेसमोर आडवे पडा, पाणी देतो!
शेतकऱ्यांच्या हातात मृत शेतकऱ्याची कवटी
..तर दिल्लीच्या रस्त्यावर नग्न आंदोलन, तामिळनाडूच्या शेतकऱ्यांचा सरकारला इशारा, कडाक्याच्या थंडीत शेतकरी अर्धनग्न पोहोचले. मृत शेतकऱ्यांची कवटी हातात घेऊन सरकारचा निषेध.
सुक्या पोळ्या खाऊन आंदोलन
– रामलीला मैदानात सुक्या पोळ्या खाऊन शेतकऱ्यांचं आंदोलन, मंगळवारी बनवलेल्या पोळ्या आदिवासी शेतकरी तीन दिवसानंतर आज गुरुवारी खात आहेत, सुक्या पोळ्या खाऊन शेतकऱ्यांचं आपल्या हक्कासाठी आंदोलन
अजित नवले पहाटे दिल्लीत दाखल
– महाराष्ट्र राज्य किसान सभेचे नेते अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली अनेक शेतकरी पहाटे 4 वाजता दिल्ली स्टेशनवर दाखल
– किसान मुक्ती मोर्चासाठी देशभरातील शेतकरी दिल्लीत दाखल व्हायला सुरूवात
– महाराष्ट्रातील आदिवासी आणि शेतकऱ्यांचा एक गट दिल्लीत दाखल झाला
– महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची स्वाभिमानी एक्सप्रेस आज रात्री दिल्लीत दाखल होणार
– देशभरातील 200 शेतकरी संघटनांचे शेतकरी आज सायंकाळपर्यंत दिल्लीत दाखल होणार
– स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ शहरातील लोकंही रस्त्यावर उतरणार
– शरद पवार, राहुल गांधी यांच्यासह 20 पेक्षा जास्त राजकीय पक्षांच्या नेत्यांना मोर्चासाठी निमंत्रण
– भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण
संसदेचे 21 दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवून त्यामध्ये स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी, महाग शिक्षण आणि आरोग्यसेवांमुळे वाढलेला कर्जाचा बोजा, कर्जामुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या, पाण्याच्या खासगीकरणामुळे वाढते जलसंकट, महिला शेतकऱ्यांचे अधिकार, शहरांकडे स्थलांतर करणाऱ्या भूमीहीन शेतमजुरांचे प्रश्न, शेतीचे भविष्य अशा सात विषयांवर संसदेत प्रत्येकी तीन दिवस चर्चा व्हावी, अशी मागणी किसान संघर्ष समन्वय समितीने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे सप्टेंबर महिन्यात एका पत्राद्वारे केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आज हा शेतकऱ्यांचा मोर्चा द्ल्लीत धडकणार आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत?