नवी दिल्ली : ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या म्हणीला अनुसरुन रामविलास पासवान यांनी भाजपला धक्का दिला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेसोबत भाजपचा झालेला काडीमोड पाहून एनडीएतील घटकपक्ष लोक जनशक्ती पक्षाने (लोजप) झारखंड विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय (LJP to Contest Polls Alone) घेतला आहे.
लोक जनशक्ती पक्षाची धुरा खांद्यावर घेतलेले खासदार चिराग पासवान यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला. झारखंडमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचं प्रदेशाध्यक्षांनी ठरवलं आहे. लोजप 50 जागांवर निवडणूक लढवणार आहे.
30 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत पाच टप्प्यांमध्ये झारखंड विधानसभा निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 81 सदस्यसंख्या असलेल्या या विधानसभेचा निकाल 23 डिसेंबर रोजी जाहीर होईल.
मी पुन्हा येईन! भाजप मध्यावधी निवडणुकांच्या तयारीला?
2014 मध्ये लोक जनशक्ती पक्षाने केवळ एकाच जागेवर उमेदवार दिला होता, मात्र ती जागाही त्यांना जिंकता आली नव्हती. लोजप अध्यक्ष रामविलास पासवान यांनी नुकतीच पुत्र चिराग पासवान यांच्यावर पक्षाची जबाबदारी सोपवली आहे.
भाजप, लोजप आणि जदयू यांचं बिहारमध्ये युतीचं सरकार आहे. नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडनेही (जदयू) झारखंड विधानसभा निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप आणि एजेएसयू (ऑल झारखंड स्टुडंट युनियन) युतीमध्ये निवडणूक लढवत आहेत. भाजपने 52 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
भाजप आणि लोजप या पक्षांनी कोणत्या तत्त्वावर युती केली होती? असा सवाल कालच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत विचारला होता. अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदावरुन बिनसल्याने शिवसेनेने आपली स्वतंत्र वाट चोखळली. त्यामुळे भाजपला महाराष्ट्रात आधीच मोठा धक्का बसला होता. त्यानंतर लोजपनेही आपला मार्ग वेगळा (LJP to Contest Polls Alone) केला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात भाजपने संघटनात्मक पुनर्बांधणीवर भर देण्यास सुरुवात केल्याचं दिसत आहे. कार्यकर्ते, नेते यांना संघटनात्मक बांधणी नव्याने मजबूत करण्याचे आणि वाढवण्याचे आदेश भाजपकडून देण्यात आले आहेत. मध्यावधी निवडणुका लागल्यास पक्षाने संघटनात्मक तयार रहावं, यासाठी भाजपने तयारी सुरु केल्याचं बोललं जात आहे.