मुंबई | 4 मार्च 2024 : राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे मोठं नाव आहे. ज्या ज्या वेळी सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरमधून निवडणूक लढविली त्या त्या वेळी त्यांनी विरोधकांना पराभवाचा धक्का दिला होता. अपवाद मात्र गेल्या दोन वेळचा. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत सुशीलकुमार यांचा पराभव झाला. तर, 2019 च्या निवडणुकीत वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या मतांमुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला. मात्र, आगामी 2024 च्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे या सोलापूरच्या रिंगणात उतरणार आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आंध्र प्रदेशचे राज्यपाल, भारताचे गृहमंत्री, सलग साडे सहा वर्षे केंद्रीय ऊर्जामंत्री, लोकसभेचे नेते असा प्रचंड अनुभवी असणारे सुशीलकुमार शिंदे. 1998 मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून ते लोकसभेत गेले. 2003 साली टर्म पूर्ण होण्याआधीच त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी लोकसभेचा राजीनामा द्यावा लागला. रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुक झाली. या निवडणुकीत भाजपचे प्रतापसिंह मोहिते-पाटील विजयी झाले होते.
2004 साली सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांना तिकीट मिळले. पण, त्यात त्यांचा पराभव झाला. भाजपचे सुभाष देशमुख यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2009 च्या निवडणुकीत स्वतः सुशीलकुमार शिंदे उभे राहिले. त्यावेळी त्यांनी विजय मिळविला. 1998 ते 2009 या काळात त्यांनी स्वतः ज्या निवडणूक लढवली त्यात ते विजयी झाले. या विजयी परंपरेला छेद मिळाला तो 2014 मध्ये.
2014 च्या निवडणूक दरम्यान देशात मोदी लाट होती. अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला त्यात सुशीलकुमार शिंदे यांचाही समावेश होता. त्या निवडणुकीत भाजपचे शरद बनसोडे निवडून आले. त्यानंतर झालेल्या 2019 च्या निवडणुकीतही सुशीलकुमार शिंदे पुन्हा पराभूत झाले. मात्र, यावेळी त्यांना भाजप उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.
सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवाचे कारण मात्र वंचितचे प्रकाश आंबेडकर ठरले. त्या निवडणुकीत आंबेडकर यांना 1 लाख 70 हजार मते मिळाली होती. सुशीलकुमार शिंदे यांना 3 लाख 66 हजार तर विजयी उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी यांना 5 लाख 24 हजार अशी मते होती. त्यामुळे शिंदे यांच्या पराभवासाठी वंचितची मते कारणीभूत ठरली असे मानले जाते.
हे ही वाचा : प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी ठरणार किंगमेकर? कुणाला धक्का, कुणाला फायदा?
2024 च्या आगामी लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघावर कॉंग्रेसने आपला दावा सांगितला आहे. या निवडणुकीसाठी सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना उतरविण्याची तयारी कॉंग्रेसने केली आहे. परंतु, ही लढाई प्रणिती शिंदे यांच्यासाठी सोपी राहिलेली नाही हे ही तितकेच खरे आहे. याचे कारण म्हणजे सोलापूर लोकसभेअंतर्गत येणाऱ्या विधानसभेत असलेलं भाजपचं वर्चस्व…
सोलापूर लोकसभेअंतर्गत सोलापूर शहर- मध्यवर्ती, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर दक्षिण, मोहोळ, अक्कलकोट आणि पंढरपूर असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील मोहोळ विधानसभा 1999 पासून राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. सोलापूर शहर उत्तरमध्ये 2004 पासून भाजपचे वर्चस्व आहे. सोलापूर दक्षिण विधानसभा 2014 आणि 2019 मध्ये काँग्रेसच्या हातून निसटली. अक्कलकोट विधानसभेत मात्र कॉंग्रेस आणि भाजप अशी दर पाच वर्षांनी अदलाबदल होतेय. पंढरपूर विधानसभेत आमदार भारत भालके यांच्या मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने बाजी मारली.
आमदार प्रणिती शिंदे यांचा सोलापूर शहर मध्यवर्ती हा मतदार संघ 20०९ मध्ये तयार झालाय. पहिल्याच निवडणुकीत प्रणिती शिंदे यांनी 34 हजार मतांची आघाडी घेतली होती. 2014 मध्ये ही आकडेवारी घसरून फक्त 9 हजारांवर आली. 2019 मध्ये 13 हजारांचा लीड आहे. त्यामुळे प्रणिती शिंदे यांना स्वतःच्याच मतदार संघातून धोका असताना त्या लोकसभेची निवडणूक कशी जिंकणार हा प्रश्न आहे.