महेश पवार, मुंबई | 19 फेब्रुवारी 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राचे राजकारण हा चर्चेचा विषय बनला आहे. राज्यातल्या दोन प्रमुख पक्षात पडलेली उभी फुट यामुळे देशाचे लक्ष महाराष्ट्राच्या राजकारणाकडे लागले आहे. कारण, उत्तर प्रदेशनंतर देशाच्या संसदेत सर्वाधिक खासदार निवडून देणारे राज्य आहे. महाराष्ट्राच्या ४८ लोकसभा जागांमुळे देशात सत्ता कुणाची हे गणित ठरत असते. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राला अनन्य साधारण महत्व आहे. त्यातच, महाराष्ट्राची राजधानी मुंबई असल्याने येथून कोणत्या पक्षांचे खासदार निवडून येणार हा सर्वाधिक चर्चेचा विषय असतो.
मुंबई जिल्ह्यात एकूण सहा लोकसभा मतदारसंघ येतात. यामध्ये उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई या सहा मतदारसंघाचा समावेश होतो. उत्तर मुंबई मतदारसंघात 16 लाखांहून अधिक मतदार आहेत. उत्तर दक्षिण मुंबई मतदारसंघात 16 लाख 98 हजार, उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघात 15 लाख 58 हजार, उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात 16 लाख 48 हजार आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात 14 लाख 15 हजार एवढे मतदार आहेत.
2019 च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांची युती होती. त्यामुळे युतीने मुंबईतील सहाच्या सहा लोकसभा जागा जिंकल्या होत्या. त्यात भाजपचे मनोज कोटक, पूनम महाजन, गोपाल शेट्टी हे तीन खासदार निवडून आले. तर, शिवसेनेच्या अरविंद सावंत, गजानन किर्तीकर, राहुल शेवाळे यांनी विरोधकांचा पराभव केला होता. मात्र, राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या आणि राजकीय गणिते बदलली.
विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदावरून बिनसले. त्यामुळे ही युती संपुष्टात आली. शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. पण, अडीच वर्षातच शिवसेना नेते आणि 40 आमदार यांनी बंड करून ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद घालविले. मुंबईतील शिवसेनेच्या तीन खासदारांपैकी गजानन किर्तीकर आणि राहुल शेवाळे हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. तर, अरविंद सावंत हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले.
एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ एक वर्षांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही बंड केले. राज्यसभा निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या या रणनीतीमुळे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि कॉंग्रेस यांना मोठा फटका आगामी लोकसभा निवडणुकीत बसणार हे निश्चित आहे. मुंबईत शिवसेनेची ताकद मोठी आहे. पण, आता शिवसेनाच दोन गटात विभागली गेली आहे. भाजपला मानणाराही एक मोठा वर्ग आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची फारशी ताकद उरली नसली तरी दोन्ही पक्षांना मानणारा मुस्लीम वर्ग मुंबईत आहे. तर, दलित समाजाची मतेही येथे निर्णायक भूमिका घेतात. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मुंबईचा मतदार कुणाच्या बाजूने उभा राहणार याची उत्सुकता आहे.