नवी दिल्ली | 5 मार्च 2024 : भाजपने लोकसभा निवडणुक 2024 साठी उमेदवारांची पहिली यादी शनिवारी जाहीर केली. या यादीत 195 उमेदवारांची तिकिटे जाहीर करण्यात आली. या यादीत पक्षाने अनेक विद्यमान खासदारांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी दिलीय. ज्या विद्यमान खासदारांना पक्षाने संधी नाकारली त्यातील अनेकांनी पक्षाचा आदेश पाळला. तर, काहींनी राजकीय संन्यास घेतला. मात्र, या यादीतून वगळण्यात आलेल्या एका खासदाराने बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. इतकेच नव्हे तर या खासदाराने पक्षाला काही जाहीर सवाल केले आहेत. ही संधी साधून काँग्रेस पक्षाने त्यांच्यासमोर मदतीचा हात पुढे केलाय.
भाजपने राजस्थानमधील 15 जागांच्या उमेदवारांची पहिली यादी निश्चित केली. यामध्ये चुरू लोकसभेचे विद्यमान खासदार राहुल कासवान यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही. त्यांच्या जागी पक्षाने पॅरालिम्पिक भाला फेकपटू देवेंद्र झाझरिया यांना तिकीट दिले. त्यामुळे राहुल कासवान संतापले. त्यांनी सोशल मिडीयावर जाहीर पोस्ट करून हायकमांडला संतप्त सवाल केलेत.
‘माझा गुन्हा काय होता…? मी प्रामाणिक नव्हतो का? मी कष्टाळू नव्हतो का? मी एकनिष्ठ नव्हतो का? मी कलंकित होतो? चुरू लोकसभेचे काम पूर्ण करण्यात मी काही कसर सोडली का? पंतप्रधानांच्या सर्व योजनांच्या अंमलबजावणीत मी आघाडीवर होतो. अजून काय हवे होते? याचे उत्तर कोणी देऊ शकत नाही का? असे स्वला राहुल यांनी विचारले आहेत.
राहुल यांनी त्यानंतर आणखी एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी भाजपला इशारा दिला. ‘राम-राम माझा चुरू लोकसभा परिवार! तुमचा विश्वास आणि पाठिंबा घेऊन आम्ही प्रत्येक संकटावर मात करू. ध्येयाच्या मार्गावर पुढे जाऊ आणि प्रगतीच्या शिखरावर जाऊ. तुम्ही सर्वांनी संयम ठेवा. येत्या काही दिवसांत मी तुमच्यामध्ये उपस्थित राहीन. ज्याची माहिती तुम्हाला दिली जाईल असे म्हणत राहुल यांनी बंडखोरीचे संकेत दिले आहेत.
चुरू या लोकसभा मतदार संघातून विजयी झालेले राहुल कासवान यांच्या कुटुंबाचा येथे खूप प्रभाव आहे. जाट समाजातून येणारे कासवान अत्यंत प्रभावशाली नेते मानले जातात. चुरूमध्ये जाट समाजाची लोकसंख्या चांगली आहे. राहुल यांनी 2014 आणि 2019 मध्ये सलग दोनदा ही जागा जिंकली आहे. राहुल यांचे वडील रामसिंग कासवान यांनीही या जागेवरून तीनदा निवडणूक जिंकली आहे. 1999, 2004 आणि 2009 मध्ये त्यांनी चुरूमधून विजय मिळवला होता.
दरम्यान, राहुल कासवान यांना आपल्याकडे खेचण्यासाठी काँग्रेसने हात पुढे करण्यास सुरुवात केलीय. बिकानेर जिल्हाध्यक्ष बिश्नाराम सियाग यांनी राहुल यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली तर ते 100 टक्के जिंकतील असा विश्वास व्यक्त केलाय. बिश्नाराम यांनी ‘तुमचा गुन्हा असा होता की तुम्ही सरंजामशाहीची गुलामगिरी कधीच स्वीकारली नाही. संघर्ष कितपत वाढवायचा? युद्ध किती दूर टाळता येईल? तुम्हीही तेजाचे वंशज आहात. भाला जमेल तितका फेकून द्या असे आवाहनही त्यांनी राहुल कासवान यांना केलंय.
राहुल कासवाण यांनी भाजपला ज्याप्रकारे उघडपणे प्रश्न उपस्थित केले आहेत त्यामुळे त्यांची वाटचाल काँग्रेसच्या दिशेने सुरु आहे अशी चर्चा राजस्थानमध्ये सुरु आहे. त्याक्प्र्माने ते अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवू शकतात अशी शक्यता वर्तविण्यात येतेय. मात्र, अद्याप कासावान यांनी यावर कोणतेही भाष्य केले नाही.