नवी दिल्ली | 20 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले. अनेक इच्छूक उमेदवारांनी पक्षांभोवती गराडा घालण्यास सुरुवात केली आहे. कुणाची युती झाली आहे तर कुणाची आघाडी. प्रतिस्पर्धी उमेदवाराला पराभूत करण्यासाठी जो तो आपापल्या परीने तयारी करत आहेत. मात्र, निवडणुकीत सामान्य व्यक्ती उमेदवार म्हणून उभा राहू शकतो का? उमेदवार अर्जासाठी अनामत रक्कम किती असते? उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी काय प्रक्रिया असते असे प्रश्न मनात येतात. तर, होय! अगदी सामान्य व्यक्तीही उमेदवार म्हणून अर्ज दाखल करू शकतो. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार निवडणुकीत उमेदवारी करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला 25 हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागते. तसेच उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा तब्बल 95 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
गेल्या निवडणुकीत निवडणूक आयोगाने लोकसभा उमेदवाराला खर्च मर्यादा 75 लाख इतकी घालून दिली होती. पण, आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ही मर्यादा 20 लाखांनी वाढवून ती 95 लाख इतकी करण्यात आली आहे. खर्च मर्यादेला निवडणूक आयोगाने आपल्या कक्षेत आणले असले तरी त्यातूनही काही पळवाटा संबंधित उमेदवारांकडून काढल्या जातात.
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणुकीला उभा राहिलेल्या उमेदवाराला त्या जागेवर झालेल्या एकूण मतदानापैकी किमान 16 टक्के मते मिळणे आवश्यक असते. जर तो उमेदवार 16 टक्के इतकी मते घेण्यास पात्र ठरला नाही तर ही अनामत रक्कम जप्त होते.
लोकप्रतिनिधी कायद्यानुसार लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला अर्जासोबत 25 हजार इतकी अनामत रक्कम जमा करावी लागते. पानार्तू, अनुसूचित जाती (एस) आणि अनुसूचित जमातीमधील (एसटी) उमेदवार यांना काही सूट देण्यात आली आहे. त्यांना 12 हजार 500 रुपये अनामत रक्कम जमा करावी लागते.
उमेदवाराने प्रचारासाठी घेतलेल्या सभा, मंडप, खुर्च्या, पाण्याच्या बाटल्या, चहा, नाश्ता, जेवण, वाहन खर्च, बॅनर, झेंडे, जाहिराती अशा सर्वच लहानसहान गोष्टींचा खर्च निवडणूक आयोगाला देणे बंधनकारक आहे. अन्यथा संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची तरतूद निवडणूक आयोगाने केली आहे.
अगदी पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होणायचा घटना घडल्या आहेत. 1951 – 52 च्या पहिल्या निवडणुकीत 1 हजार 874 उमेदवारांनी निवडणूक लढविली होती. त्यातील 745 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली होती. तर, 1996 च्या निवडणुकीत 91 टक्के उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती.