सोलापूर : सध्या ‘शेतकरी नवरा नको गं बाई’, अशी परिस्थिती आहे. पण याला माढा तालुक्यातील उपळाई येथील एक शेतकऱ्याची मुलगी अपवाद ठरली आहे. उपळाई येथील दीपक देशमुख यांची कन्या ऐश्र्वर्या देशमुख हिला आपला शेतकरी असलेला नवरदेव नितीन बाबरने सासरला घेऊन जाण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर पाठवून दिलं. ऐश्वर्या आणि नितीन यांचा विवाह सोहळा उद्या पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे होणार आहे.
नितीन बाबर यांचं शिक्षण MBA (Master of Business Administration) पर्यंत झालंय. नितीन हे कासेगाव येथे आपली वडिलोपार्जित शेती आधुनिक पद्धतीने करुन भरघोस उत्पन्न घेतात. आपल्या पत्नीसह संबंध स्त्री जातीचा सन्मान करण्याच्या हेतूने नितीन यांनी केलेल्या प्रयोगाचं कौतुक केलं जातंय. मुलीला नेण्यासाठी माहेरुन पहिल्यांदाच गावात हेलिकॉप्टर आल्याने ग्रामस्थ जिथे हेलिकॉप्टर येणार आहे तिथे ठाण मांडून बसले होते. ग्रामस्थांनी ही घटना आमच्यासाठी अविस्मरणीय अशीच राहणार असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
गावात हेलिकॉप्टर येण्यापूर्वी ऐश्वर्याची गावातून वाजत गाजत मिरवणूक देखील काढण्यात आली. पूर्वीच्या काळात नवरीला सासरला पाठवण्यासाठी बैलगाडी गाडी वापरली जायची. पुढे जाऊन चारचाकी गाड्यांमधून पाठवलं जाऊ लागलं. उपळाई(बुद्रुक)मध्ये मात्र मुलीला नेण्यासाठी हेलिकॉप्टरच आल्याने हायटेक युगा बरोबर सर्व काही बदलताना दिसतंय.
दरम्यान, शेतकऱ्याने बायकोसाठी हेलिकॉप्टर वापरण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही मावळातील डोणे येथील नवरदेवाने 8 मे रोजी साजरा होणाऱ्या विवाह सोहळ्यासाठी शिवपार्वती लॉन हिंजवडी पुणे येथे जाण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला. डोणे गावातील शेतकरी कुंटुबातल्या नवरदेवाचे नाव अशोक वाडेकर असं आहे. केवळ दिवंगत वडिलांची इच्छा असल्यानेच लग्नात हेलिकॉप्टर आणल्याची माहिती नवरदेवाने दिली होती. घोटावडे मुळशी येथील काळुराम देवकर यांची मुलगी पुजा हिच्याशी होणाऱ्या लग्नासाठी वाडेकर कुटुंबीयांनी पुणे येथील एका कंपनीचं हेलिकॉप्टर 75 हजार रूपये प्रतितास दराने भाडेतत्वार घेतलं होतं.
VIDEO :